राज्यात आजपासून प्लॅस्टिकबंदी लागू, कारखान्यांवर छापे टाकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 06:32 AM2018-06-23T06:32:45+5:302018-06-23T06:32:49+5:30
राज्य सरकारच्या प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी उच्च न्यायालयाने २० जुलैपर्यंत शुक्रवारी तहकूब केल्याने, राज्यात शनिवारपासून प्लास्टिकबंदी लागू झाली आहे.
मुंबई : राज्य सरकारच्या प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी उच्च न्यायालयाने २० जुलैपर्यंत शुक्रवारी तहकूब केल्याने, राज्यात शनिवारपासून प्लास्टिकबंदी लागू झाली आहे. बंदी हटविण्यास न्यायालयाने आधीच नकार दिला आहे. बंदीच्या व्यवस्थित व परिणामकारक अंमलबजावणीसाठी पहिल्या टप्प्यात प्लॅस्टिक कारखान्यांवर छापे टाकून गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी शुक्रवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत अधिका-यांना दिले.
राज्य सरकारने २३ जूनपासून राज्यात प्लॅस्टिकबंदी लागू करण्याचा आदेश काढला होता. त्यास प्लॅस्टिक उत्पादक व वितरकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. शुक्रवारी सुनावणी २० जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली. त्यानंतर, पर्यावरणमंत्री कदम यांनी बैठक घेतली. त्याला युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते. त्या वेळी कदम म्हणाले की, जमा होणारे प्लॅस्टिक व त्यावरील ‘रिसायकलिंग’चा अहवाल आठ दिवसांत सादर करावा. पर्यटन व तीर्थस्थळे, यात्रा, उत्सवाच्या वेळी भाविकांना व ग्राहकांना प्लॅस्टिकच्याच पिशव्या दिल्या जातात, ते थांबवावे. प्लॅस्टिक पिशव्यांचे उत्पादन व साठा करणाºयांवर आणि दुकानदारांवर कारवाई करून, साठा जप्त करण्यात यावा.
>थर्माकोलला गणेशोत्सवात सूट?
गणेशोत्सवात थर्माकोलचे मखर वापरण्यास काहींनी परवानगी मागितली आहे. विकलेले मखर परत घेऊन त्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेकडे सुपूर्द करण्याचे हमीपत्र दिल्यास गणेशोत्सवासाठी थर्माकोलबंदी हटविण्याबाबत निर्णय घेण्याचा सरकारचा विचार आहे.
>मोदींवर टीका; तयारी करून निर्णय
केंद्र सरकारच्या नोटाबंदीप्रमाणे प्लास्टिकचा निर्णय तडकाफडकी घेतलेला नाही. नऊ महिन्यांपासून त्याची तयारी व अभ्यास सुरू होता. त्यामुळे लोकांमध्येही मोठ्या प्रमाणावर जागृती निर्माण झालेली आहे. नियम न पाळणारी मंडळीच दंडाच्या रकमेची चिंता करत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
विनापरवाना प्लॅस्टिक उत्पादन करणाºया कारखान्यांवर गुन्हे दाखल करून ते सील करा. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरण समिती आहे. तिने बंदीबाबत जनजागृती कार्यक्रमाचा आढावा घ्यावा.
- रामदास कदम, पर्यावरण मंत्री
>असा होईल दंड
पहिल्यांदा
नियम मोडणे 5,000
दुस-यांदा
नियम मोडणे 10,000
तिस-यांदा
नियम मोडणे 25,000 व ३ महिन्यांचा होणार तुरूंगवास
> कोणालाही दंडात सूट मिळणार नाही
बंदी असलेले 80%प्लॅस्टिक गुजरातमधून महाराष्ट्रात येते. ते आणणाºयास तीन महिन्यांची शिक्षा होईल. 1200टन प्लॅस्टिक कचरा रोज राज्यात तयार होतो. 17 राज्यांनी आतापर्यंत प्लास्टिक बंदी केली आहे. महाराष्ट्र अठरावे राज्य आहे.