मोदींना 'ट्राय' केलंत, ते नापास झालेत; आता काँग्रेसला संधी द्या!- राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 05:00 PM2018-10-02T17:00:55+5:302018-10-02T17:06:33+5:30
विविध मुद्यांवरुन राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर सडकून टीका
वर्धा: नरेंद्र मोदींना तुम्ही संधी दिलीत. त्यांना ट्राय केलंत. मात्र ते नापास झाले. आता काँग्रेसला एक संधी द्या, असं आवाहन राहुल गांधींनी देशवासीयांना केलं आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यानंतर राहुल गांधींनी भाषण केलं. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवरुन पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली.
गेल्या काही दिवसांपासून राफेल डीलच्या मुद्यावरुन राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर सतत टीका केली आहे. वर्ध्यातही राहुल यांनी राफेल विमान खरेदीवरुन मोदींना लक्ष्य केलं. राफेल विमान खरेदीबद्दल मोदी नजरेला नजर भिडवून बोलत नाहीत. मोदींनी देशाच्या जनतेच्या नजरेला नजर भिडवून राफेल विमान खरेदीबद्दल बोलावं, असं आव्हान त्यांनी दिलं. रोजगार, हमीभाव, काळा पैसा याबद्दल मोदींनी दिलेली सर्व आश्वासनं हवेत विरली आहेत. तुम्ही मोदींना संधी दिलीत. ते नापास झाले. आता काँग्रेसला संधी द्या, असं आवाहन यावेळी राहुल यांनी केलं.
Bola tha main PM nahi banna chahta, chowkidaari karna chahta hu. Modi Ji, aapne Gandhi Ji ke baare me article likha.Ab aap ek baat bata dijiye,ye jo apke mitra hai Ambani Ji jinke jeb me aapne Hindustan ka 30,000 cr rupay daala, btaiye aapne ye kaam kyo kiya: R Gandhi in Wardha pic.twitter.com/j0O6iZcIKZ
— ANI (@ANI) October 2, 2018
राहुल गांधींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे-
- शेतमालाला योग्य दर मिळण्याचं मोदींचं आश्वासन हवेत विरलं
- मोदींनी जनतेला दिलेली आश्वासनं पाळली नाहीत
- अनिल अंबानींकडे विमान निर्मितीचा अनुभव नाही, तरी त्यांना राफेलचं कंत्राट
- अंबानींनी कोणत्या विमानाची निर्मिती केली?
- पीएम भाषणातून जातीय तेढ निर्माण करतात
- मोदींनी जनतेच्या खिशातला पैसा अंबानींना दिला
- लाल किल्ल्यावरुन मोदींनी देशाचा अपमान केला
- मोदींनी तुम्हाला काळ्या पैशाविरोधात लढण्यासाठी रांगेत उभं केलं, त्यावेळी श्रीमंत उद्योगपती कुठे होते?
- तुमच्याकडचा पैसा मोदींनी हिसकावून घेतला
- नोटाबंदीनंतर बँकांसमोरील रांगेत किती सूटबूटवाले होते, नीरव, ललित, माल्ल्या रांगेत दिसले का?
- मोदी चौकीदार नव्हे भागीदार
- मोदी उद्योगपतींची चौकीदारी करतात
- तरुणांना फुकटात काही नको, त्यांना रोजगार हवा