पोलिसांची सतर्कता; अल्पवयीन मुलगी सुपूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2017 01:43 AM2017-04-08T01:43:11+5:302017-04-08T01:43:11+5:30
आठ दिवसांपूर्वी घरातून निघून गेलेली अल्पवयीन मुलगी जेजुरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे नातेवाईकांच्या स्वाधीन केले.
जेजुरी : आठ दिवसांपूर्वी घरातून निघून गेलेली अल्पवयीन मुलगी जेजुरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे नातेवाईकांच्या स्वाधीन केले.
हातकनंगले, जि. कोल्हापूर येथून मनीषा परशुराम कांबळे ही १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरामध्ये कोणालाही न सांगता निघून गेली होती. या मुलीला आई-वडील नसल्याने या मुलीसह तिच्या छोट्या भावाचा सांभाळ तिची मोलमजुरी करणारी आत्या रूपाली सुनील बामणे या करत आहेत. आठ दिवसांपूर्वी निघून गेलेल्या मुलीबाबत हातकणंगले पोलीस ठाण्यात खबरही देण्यात आलेली होती. जेजुरी येथील खंडोबा गडाच्या पायरीमार्गावर एक अल्पवयीन मुलगी फिरत असल्याचे तेथील व्यावसायिकांना आढळून आली. त्यांनी तत्काळ जेजुरी पोलीस ठाण्यात माहिती दिली. सहायक पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी मुलीकडून माहिती घेत हातकणंगले पोलीस ठाण्याशी संपर्क साधला त्यानंतर तेथील पोलिसांनी तिच्या आत्याला भ्रमणध्वनीवरून संपर्क करीत मुलगी जेजुरी पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती दिली. मुलीला तिच्या आत्याच्या स्वाधीन करण्यात आले. देवदर्शनाच्या कुतुहलापोटी सदरील मुलगी एकटीच पंढरपूर व तेथून जेजुरीला आले़