ठाण्यात मद्यधुंद कारचालकाने पोलिसाच्या अंगावर घातली गाडी

By admin | Published: September 4, 2016 03:42 AM2016-09-04T03:42:40+5:302016-09-04T03:42:40+5:30

मुंबईतील वाहतूक पोलीस विलास शिंदे यांच्यावरील हल्ल्याला आठवडाही उलटत नाही तोच ठाण्यात एका मद्यपी कारचालकाने शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास नौपाडा

Police inspector in Thane | ठाण्यात मद्यधुंद कारचालकाने पोलिसाच्या अंगावर घातली गाडी

ठाण्यात मद्यधुंद कारचालकाने पोलिसाच्या अंगावर घातली गाडी

Next

ठाणे : मुंबईतील वाहतूक पोलीस विलास शिंदे यांच्यावरील हल्ल्याला आठवडाही उलटत नाही तोच ठाण्यात एका मद्यपी कारचालकाने शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास नौपाडा वाहतूक उपशाखेचे पोलीस हवालदार नरसिंग साहेबराव महापुरे यांच्या अंगावर गाडी घातली व सुमारे अर्धा किमीपर्यंत फरफटत नेले. सुदैवाने महापुरे यांनी कारचे बोनेट दोन्ही हाताने पकडल्याने ते बचावले. या वेळी नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी त्या मद्यपी चालकावर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यास अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. यापूर्वी ठाण्यात गेल्या वर्षी एका शिवसेना शाखाप्रमुखाने महिला पोलीस शिपायास मारहाण केल्याची घटना घडली होती.
महापुरे हे तीनहातनाका येथे शनिवारी सकाळी १० च्या सुमारास कर्तव्यावर होते. याचदरम्यान, नो-एण्ट्रीमधून भरधाव वेगाने येणारी कार पाहून तिला थांबवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र, कारचालक योगेश भांबरे याने त्यांच्या अंगावरच गाडी घातल्याने त्यांचा तोल कारच्या बोनेटवर गेला व त्यांनी ते पकडले. हे पाहून कारचालकाने गाडीचा वेग वाढवून जोरजोरात स्टेअरिंग फिरवून त्यांना खाली पाडण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना जवळपास अर्धा किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. याचदरम्यान, महापुरे यांनी लोकांचे लक्ष वेधण्यासाठी आरडाओरडा केला. त्या वेळी एका रिक्षाचालकाने आपली रिक्षा आडवी टाकून ती कार थांबवली. यामध्ये महापुरे किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रु ग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आले.
कारचालक योगेश भांबरे हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. याचदरम्यान, गाडीतील त्याच्या सहकाऱ्याने पळ काढला. नागरिकांनी भांबरे याला पकडून नौपाडा पोलिसांच्या हवाली केले. त्याच्यावर सरकारी कामात अडथळा, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न आदी कलमान्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच त्याच्या रक्ताचे नमुनेही घेण्यात आले आहेत.
या घटनेची माहिती मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना कळताच, त्यांनी नरसिंग महापुरे यांची फोनवरून विचारपूस केली. ठाकरे यांनी महापुरे यांना कुठे जखम झाली नाही ना, ही गोष्ट प्रामुख्याने विचारली. तत्पूर्वी मनसे कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यातही धाव घेतली होती.
या घटनेनंतर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप पालवे यांनी महापुरे यांची विचारपूस केली. तसेच त्यांच्या धाडसाचे कौतुक केले. (प्रतिनिधी)

2015 मध्ये ठाण्यातील नितीन कंपनी येथील सिग्नलवर मोबाइल फोनवर बोलणाऱ्या कारचालकाकडे वाहन परवान्याची मागणी केली. त्या वेळी त्याने त्या महिला कॉन्स्टेबलला मारहाण केली. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कै द झाला होता. मारहाण करणारा चालक हा धर्मवीरनगर येथील शिवसेना शाखाप्रमुख असल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी करून त्याच्यावर न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले आहे.

नशीब बलवत्तर म्हणून बचावलो. कारचालकाने दोन वेळा स्टेअरिंग जोरजोरात फिरवली. तो नो-एण्ट्रीतून येत असल्याने त्याला थांबण्याचा इशारा केला. बोनेट पकडले नसते, तर तो मला उडवून गेला असता.
- नरसिंग महापुरे, पोलीस हवालदार

कारचालक योगेश भांबरे याच्यावर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. तसेच त्याच्या रक्ताचे नमुनेही घेऊन ते तपासणीसाठी पाठवले आहेत.
- गजानन काब्दुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नौपाडा पोलीस ठाणे

Web Title: Police inspector in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.