पोलिसांनो, मोबाईलवर सभ्य रिंगटोन ठेवा - विश्वास नांगरे पाटील
By Admin | Published: December 23, 2015 10:19 AM2015-12-23T10:19:49+5:302015-12-23T10:20:14+5:30
चित्रपटातील गाणी व इतर कर्कश आवाजच्या मोबाईल रिंगटोन्समुळे पोलिस दलाची प्रतिमा मलीन होते असे सांगत पोलिसांनी मोबाईलवर सभ्य रिंगटोन ठेवावी असा आदेश विश्वास नांगरे पाटील यांनी दिला.
>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. २३ - चित्रपटातील गाणी व इतर कर्कश आवाजच्या मोबाईल रिंगटोन्समुळे पोलिस दलाची प्रतिमा मलीन होते असे सांगत पोलिसांनी मोबाईलवर सभ्य रिंगटोन ठेवावी असा आदेश औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिला आहे.
आजकाल चित्रपटातील लोकप्रिय गाणी, इतर हिट टयुन्स, प्राणी पक्षांचे वा इतर आवाज अशा रिंगटोन्स ठेवण्याची क्रेझ असून पोलिस कर्मचा-यांच्या मोबाईलवरही अशा टोन्स सर्रास ऐकू येतात. मात्र त्यामुळे जनसामान्यांमध्ये पोलिस दलाची प्रतिमा मलीन होते असे सांगत कर्मचा-यांनी त्यांच्या मोबाईलची रिंगटोन पोलिस दलाच्या प्रतिष्ठा जोपासेल, अशी ठेवावी असा आदेश विश्वास नांगरे पाटील यांनी दिला आहे. त्यासाठी त्यांनी एक एका परिपत्रकच जारी केले आहे.
' आमचे असे निदर्शनास आले आहे की, परिक्षेत्रातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे मोबाईलची रिंगटोन ही चित्रपट गीत, कर्कश आवाज, विविध पक्षांचे आवाज इ. असल्याचे दिसून आले आहे. सदरच्या रिंगटोनमुळे जनमानसात पोलीस दलाची प्रतिमा मलीन होत आहे. शिस्तप्रिय पोलीस दलामध्ये राजशिष्टाचाराचे अनुषंगाने घटकप्रमुख यांनी आपले अधिपत्याखालील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सदरबाबत योग्य त्या सूचना द्यावात. आपले घटकातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे मोबाईलची रिंगटोन ही योग्य व चांगली असणेबाबत संबंधितांना सूचना देऊन त्याप्रमाणे कार्यवाही करावी' असे त्या पत्रकात म्हटले आहे.
प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱयाने पोलीस दलाची प्रतिष्ठा जोपासली पाहिजे, असेही विश्वास नांगरे पाटील यांनी या पत्रकात म्हटले आहे. औरंगाबाद ग्रामीण, बीड, जालना, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली येथील पोलीस अधिक्षकांना हे पत्रक धाडण्यात आले आहे.