पोस्टमनचा बेजबाबदारपणा, केली शेकडो आधार कार्डची शेकोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2017 08:18 PM2017-10-29T20:18:31+5:302017-10-29T20:18:38+5:30
अमरावती - चिखलदरा परिसरातील नागरिकांचे आलेले शेकडो आधारकार्ड वितरित न करता निलंबित पोस्टमनने घरात ठेवले. थंडीचे दिवस पाहता त्याच्या मुलाने पहाटे त्याची शेकोटी पेटवून हात शेकण्यासाठी वापर केल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील काटकुंभ येथे गुरुवारी पहाटे ७.३० वाजता काही नागरिकांमुळे उघडकीस आला.
गुरूवारी सकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान निलंबित पोष्टमनच्या मुलाने घरानजीक शेकोटी पेटविल्याने परिसरातील काही नागरिकांचे त्याकडे लक्ष गेले. निरीक्षण केले असता आधारकार्ड जाळत असल्याचे दिसले. त्यावर संशय बळावला. आधार कार्ड, एटीएम कार्ड जाळत असल्याचे दिसल्याने नागरिकांनी विझवून आधारकार्ड बाजूला काढले. आतापर्यंत किमान चारशेच्यावर आधारकार्ड जाळल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
दस्तऐवज गेले कुठे ?
काटकुंभ परिसरातील नागरिकांचा व्यवहार आजही मोठ्या प्रमाणात पोष्ट कार्यालयावर अवलंबून आहे. परिणामी विद्यार्थ्यांना परीक्षेचे वेळापत्रक, हॉल तिकीट, आधारकार्ड, एटीएम कार्ड, शासकीय दस्तावेज आदी संबंधीत कार्यालयातून पाठविवरही नागरिकांना ते मिळतच नसल्याची ओरड वर्षभरापासून सुरू आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ येथील पोस्टमन प्रकाश रामदयाल मालवीय हा सहा महिन्यांपासून निलंबित आहे. त्याने काटकुंभ येथील शेतात मळणीसाठी ठेवलेल्या सोयाबीन गंजीला पेटवून दिले होते. नागरिकांनी त्याला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले होते. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले.
काटकुंभ येथे आधारकार्ड जाळण्यात आले काय, याची माहिती घेतली जात आहे. नागरिकांची अजूनपर्यंत तक्रार आलेली नाही. आम्ही तपास सुरू केला आहे.
- जहीर अहमद,
पोस्ट मास्तर, परतवाडा