प्रकाश आंबेडकरांकडून आंबेडकरी विचारांना तिलांजली, सुशीलकुमार शिंदे यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 04:35 PM2019-04-16T16:35:13+5:302019-04-16T16:53:55+5:30
माजी केंद्रीय मंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर जोरदार टीका केली.
सोलापूर - माजी केंद्रीय मंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर जोरदार टीका केली. '' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तीन वर्षे अभ्यास करून देशाला राज्यघटना दिली. मात्र डॉ. आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी जातीयवादी शक्तींशी हातमिळवणी केली आहे,'' असा टोला सुशीलकुमार शिंदे यांनी लगावला. तसेच ही आपली शेवटची निवडणूक आहे, असे सांगत सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरमधील मतदारांना भावूक आवाहन केले.
सोलापूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्यावर जोरदार टीका केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तीन वर्षे अभ्यास करून देशाला राज्यघटना दिली. मात्र डॉ. आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी जातीयवादी शक्तींशी हातमिळवणी केली आहे. प्रकाश आंबेडकर हे सेक्युलर मतांची विभागणी करण्यासाठी सोडलेले भाजपाचे पिल्लू आहे.'' असा टोला सुशीलकुमार शिंदे यांनी लगावला.
यावेळी सत्ताधारी भाजपाचाही शिंदे यांनी सत्ताधारी भाजपावरही टीका केली. भाजपाने सोलापूरमध्ये एकतरी प्रकल्प आणला आहे का, असा सवाल शिंदे यांनी विचारला. तसेच केवळ जातीय समीकरणे डोळ्यांसमोर ठेवून भाजपाकडून जयसिद्धेश्वर स्वामी यांनी उमेदवारी देण्यात आली असे, शिंदे म्हणाले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्हिजन नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी मागे सोलापूरमध्ये आले होते तेव्हा येथील कापड उद्योगाबाबत भरभरून बोलले होते. मात्र या उद्योगाची भरभराट व्हावी यासाठी त्यांनी काय केले? मोदींनी पाच वर्षांत येथील एक मीटर तरी कापड खरेदी केले आहे का? असा सवालही त्यांनी विचारला.