संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी तयार : मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 02:59 PM2018-10-09T14:59:40+5:302018-10-09T15:00:53+5:30
मंत्रिमंडळाची आज बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये अन्य निर्णयही घेण्यात आले.
मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत आज आढावा घेण्यात आला असून लवकरच दुष्काळ जाहीर करण्यात येईल. यासाठी केंद्र सरकारच्या दुष्काळ नियंत्रण नियमावलीनुसार नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.
मंत्रिमंडळाची आज बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये अन्य निर्णयही घेण्यात आले. सहकारी संस्थांतील अधिकारी-कर्मचारी तसेच पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू राहण्यासह या संस्थांच्या आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी प्रत्येक सहकारी संस्थेस शिक्षण निधी देण्यासाठी अधिनियमात सुधारणा करण्यात आली.
तसेच नियमांच्या किरकोळ उल्लंघनाबाबत औषध उत्पादक, विक्रेते तसेच मान्यताप्राप्त चाचणी प्रयोगशाळांना दंड आकारण्यासाठी नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली.
महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियमातील कलमामध्ये सुधारणा केली असून निर्धारण आदेश नव्याने पारित करण्यासाठी अतिरिक्त 6 महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.
परभणी जिल्ह्यातील एरंडेश्वर (ता. पूर्णा) येथील जय भवानी महिला सहकारी सूतगिरणीची बाराव्या पंचवार्षिक योजनेमधून अर्थसहाय्यासाठी निवड करण्यात आली.
सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील तारळी मोठा पाटबंधारे प्रकल्पास 1 हजार 610 कोटीच्या किंमतीस चौथी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली.