लोकसेवा आयोग एका सदस्यावर
By Admin | Published: May 19, 2014 02:57 AM2014-05-19T02:57:29+5:302014-05-19T02:57:29+5:30
राज्यसेवेतील अधिकार्यांच्या भरती प्रक्रियेची मुख्य जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचा कारभार अवघ्या एका सदस्यावर आला आहे.
राजेश निस्ताने, मुंबई/यवतमाळ - राज्यसेवेतील अधिकार्यांच्या भरती प्रक्रियेची मुख्य जबाबदारी असलेल्या महाराष्टÑ राज्य लोकसेवा आयोगाचा कारभार अवघ्या एका सदस्यावर आला आहे. आयोगाचे अध्यक्ष सुधीर ठाकरे रविवारी १८ मे रोजी निवृत्त झाले. शिवाय आयोगावरील चार सदस्यांच्या जागा आधीच रिक्त आहेत. १९६२ ला स्थापन झालेल्या राज्य लोकसेवा आयोगाची एक अध्यक्ष आणि पाच सदस्य अशी रचना आहे. दोन वर्षांपूर्वी आयोगाचे बारावे अध्यक्ष म्हणून सुधीर ठाकरे यांनी जबाबदारी स्वीकारली. आयोगाच्या सदस्यांची दोन पदे दोन वर्षांपासून तर अन्य दोन पदे सहा महिन्यांपासून रिक्त आहेत. आयोगावर आता प्रकाश ठोसरे हे एकमेव सदस्य उरले असून, त्यांच्याकडे अध्यक्षपदाची अतिरिक्त जबाबदारी राहणार आहे. आयोगाच्या या दुरवस्थेस शासनाला जबाबदार मानले जात आहे. नव्या अध्यक्षासाठी ६० अर्ज नव्या अध्यक्षपदासाठी आतापर्यंत ५० ते ६० अर्ज आल्याची माहिती आहे. त्यातून लॉबिंगही केले जात आहे. त्यात बहुतांश सेवानिवृत्त सनदी अधिकार्यांचा समावेश आहे. त्यातूनच सदस्यही निवडले जाणार आहे. सुधीर ठाकरे हे विदर्भातील तिसरे अध्यक्ष होते. याआधी टी. जी. देशमुख व डॉ. गोहोकार यांची वर्णी लागली होती. आयोगावरील अध्यक्ष आणि सदस्यांच्या नियुक्त्या होईपर्यंत नोकरभरती व मुलाखतीची एकूणच प्रक्रिया गोठणार आहे. आॅनलाइन परीक्षा, पारदर्शकता, परीक्षांचा दर्जा सुधारणे, कोणताही अनुशेष नसणे ही माझी दोन वर्षांतील मुख्य कामगिरी राहिली आहे. सैन्य दलाप्रमाणे ग्रुप डिस्कशन पद्धतीने मुलाखतीची माझी योजना होती. मात्र पुरेसा वेळ न मिळाल्याने त्याची अंमलबजावणी करू शकलो नाही, असे महाराष्टÑ राज्य लोकसेवा आयोगाचे निवृत्त अध्यक्ष सुधीर ठाकरे यांनी सांगितले.