पुणे - डेक्कन क्वीन अडवणा-या महिला प्रवाशी "राष्ट्रद्रोही", रेल्वेचा अजब कारभार
By Admin | Published: July 13, 2017 10:51 AM2017-07-13T10:51:09+5:302017-07-13T13:03:07+5:30
ऑनलाइन लोकमत पुणे, दि. 13 - पुणे ते मुंबईदरम्यान जाणा-या डेक्कन क्वीन ट्रेनला रोखून धरणा-या महिला प्रवाशांचा रेल्वेने राष्ट्रद्रोही ...
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 13 - पुणे ते मुंबईदरम्यान जाणा-या डेक्कन क्वीन ट्रेनला रोखून धरणा-या महिला प्रवाशांचा रेल्वेने राष्ट्रद्रोही म्हणून उल्लेख केला आहे. 10 जुलै रोजी डेक्कन क्वीन प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आणण्याची मागणी करत काही प्रवाशांनी ट्रेन रोखून धरली होती. यामुळे ट्रेनला तब्बल एक तास उशीर झाला होता. याचा फटका नेहमी मुंबई ते पुणे अप-डाऊन करणा-या आणि इतर प्रवाशांना बसला होता. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी कारवाई करत तीन महिला प्रवाशांना अटक करुन त्यांना न्यायाधीशांसमोर हजर केलं.
आणखी वाचा
महिला प्रवाशांना न्यायालयात हजर केलं असता त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली. रेल्वेने या घटनेसंबंधी प्रसिद्धी पत्रक काढलं आहे. या प्रसिद्धी पत्रकात रेल्वे रोखण्याचं हे कृत्य राष्ट्रद्रोही ठरवण्यात आलं आहे. पुणे रेल्वे स्थानकावर सोमवारी सकाळी डेक्कन क्वीन रोखणा-या सुमारे १०० प्रवाशांवर कारवाई करण्यात येणार असून त्यातील तीन महिलांना अटक करण्यात आली होती.
सीमा सुहास गाडगीळ (वय ५५), वर्षा योगेश रेळे (वय ५०), फातीमा जाफर हुसेन (५४) अशी या महिलांची नावे आहेत. गाडगीळ आणि रेळे या मुंबई महापालिकेत अधिकारी आहेत. रेल्वे फलाटावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे या महिलांना पकडण्यात आले होते. त्यांना रेल्वे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली.
गाडी पाचवरून सुटणार
डेक्कन क्वीन भविष्यातही प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवरूनच सोडण्यात येईल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे डेक्कन क्वीन आता पुन्हा प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरून केव्हा धावणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
https://www.dailymotion.com/video/x84579s
गेल्या कित्येक वर्षांपासून पुणे रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक १ वरुन सोडण्यात येणारी डेक्कन क्वीन फेब्रुवारीपासून फलाट क्रमांक ५ वरुन सोडण्यास सुरुवात केली आहे. फलाट क्रमांक १ व ५ वरच २४ डब्ब्यांच्या गाड्या उभ्या राहू शकतात. अन्य फलाट इतके लांब नाहीत. त्यामुळे झेलम एक्सप्रेस व अन्य गाड्या फलाट १वर थांबविण्यात येऊ लागल्याने डेक्कन क्वीन फलाट क्रमांक ५ वरुन सोडण्यात येऊ लागली आहे. याचा नियमित प्रवाशांना त्रास होत असल्याने ती नेहमीप्रमाणे फलाट क्रमांक १ वरुन सोडावी अशी मागणी नियमित प्रवाशांकडून होत होती. परंतु, ती मान्य न झाल्याने सोमवारी आंदोलन करुन डेक्कन क्वीन सुमारे एक तास रोखण्यात आली होती.
याबाबत पुणे प्रादेशिक रेल्वे महाव्यवस्थापक बी के़ दादाभोय यांनी सांगितले की, अशा राष्ट्रविरोधी घटना कधीही सहन केल्या जाणार नाही. त्यावर कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल. गाड्या वेळेवर चालविण्यासाही प्रवाशांनी सहकार्य करावे. त्यांनी कायदा हातात घेऊन नये, असे आवाहन त्यांनी केले.