पुण्यात ‘सोवळ्या’चा वाद पेटला , मेधा खोलेंवर टीकेचा भडिमार; विविध संघटनांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 04:54 AM2017-09-09T04:54:31+5:302017-09-09T04:55:04+5:30
खोटी जात सांगून ‘सोवळे मोडले’ म्हणून स्वयंपाकिणीविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल होताच सर्वत्र तीव्र पडसाद उमटले. फसवणुकीची तक्रार करणा-या हवामान शास्त्र विभागाच्या माजी संचालिका डॉ. मेधा विनायक खोले यांच्यावर सर्वस्तरातून टिकेचा भडिमार
पुणे : खोटी जात सांगून ‘सोवळे मोडले’ म्हणून स्वयंपाकिणीविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल होताच सर्वत्र तीव्र पडसाद उमटले. फसवणुकीची तक्रार करणा-या हवामान शास्त्र विभागाच्या माजी संचालिका डॉ. मेधा विनायक खोले यांच्यावर सर्वस्तरातून टिकेचा भडिमार होत आहे. विविध संघटनांनी आज निदर्शने करत निषेध नोंदविला. तर, सोवळ्याचा संबध शुचिर्भूतता आणि स्वच्छतेशी असून त्याचा जातीशी काहीही संबंध नाही. त्यामुळे डॉ. खोले यांनी दाखल केलेली तक्रार मागे घेऊन हे प्रकरण सामोपचाराने मिटवावे, अशी भूमिका अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने घेतली आहे.
‘सोवळं मोडलं’ म्हणून डॉ. मेधा खोले यांनी त्यांच्या घरी स्वंयपाक करणाºया निर्मला यादव (वय ५०) यांच्या विरोधात दिलेल्या फिर्यादीवरून राज्यात खळबळ उडाली आहे. यादव यांनी ‘कुलकर्णी’ आडनाव सांगून आपल्याकडे नोकरी मिळवली आणि सुवासिनी आहे, असे सांगून आपल्या घरी स्वयंपाक केला’, अशी तक्रार डॉ. खोले यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री नोंदवली होती. पोलिसांनी यावरून यादव यांच्यावर गुन्हाही दाखल केला आहे. तर ‘मी खोटे नाव सांगून नोकरी मिळवलेली नाही. उलट डॉ. खोले यांनी माझ्या घरी येऊन मला मारहाण केली,’अशी परस्परविरोधी तक्रार निर्मला यादव यांनी अभिरुची पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांची भेट घेऊन खोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. ‘देव बाटला, सोवळे मोडले’ म्हणून पोलीस ठाण्यात तक्रार करणाºया डॉ. खोले यांनी संविधानाचा अपमान केला असून त्यांच्याविरुद्धच गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ब्रिगेडने केली. मराठा क्रांती मोर्चा, राष्ट्रवादी काँग्रेसची युवती शाखा, शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने वेधशाळा व डॉ. खोले यांच्या घरासमोर निदर्शने केली. तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव मिलींद देशमुख आणि पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांनी यादव यांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराबाबत माहिती घेतली. या प्रकाराचा अंनिसच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे.
सोशल मीडियावरही पडसाद : पुण्यात आज या घटनेचे पडसाद सकाळपासूनच उमटण्यास सुरुवात झाली. सोशल मीडियावर यावरून उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत होत्या. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने दुपारीच पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. सोवळ्याचा संबध शुचिर्भूतता आणि स्वच्छता याच्याशी असून, त्याचा जातीशी काहीही संबंध नाही. फसवणुकीचा जो गुन्हा वृद्ध महिलेविरोधात दाखल करण्यात आला त्यांच्या वयाचा विचार करता खोले यांनी तक्रार मागे घ्यावी आणि हे प्रकरण सामोपचाराने मिटवावे ही आमची भूमिका असल्याचे महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष आनंद दवे यांनी सांगितले.