पंजाबच्या लिपिकास शिताफीने अटक!
By admin | Published: January 30, 2017 04:08 AM2017-01-30T04:08:34+5:302017-01-30T04:08:34+5:30
बोगस शस्त्र परवान्यांचे वाटप करणाऱ्या टोळीतील पंजाबमधील एका लिपिकास ठाणे पोलिसांनी शिताफीने अटक केली. दीड वर्षापासून फरार असलेल्या या आरोपीस पंजाबमध्ये ताब्यात घेताना
ठाणे : बोगस शस्त्र परवान्यांचे वाटप करणाऱ्या टोळीतील पंजाबमधील एका लिपिकास ठाणे पोलिसांनी शिताफीने अटक केली. दीड वर्षापासून फरार असलेल्या या आरोपीस पंजाबमध्ये ताब्यात घेताना, त्याने पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्नही केला. आरोपी ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत असून, या टोळीतील आणखी २५ आरोपींचा शोध सुरू आहे.
ठाण्यातील एका रहिवाशास रिव्हॉल्व्हर देण्यासाठी आलेल्या निदानसिंग नावाच्या आरोपीस, जुलै २०१५ मध्ये ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या माहितीवरून अटक केली होती. त्याच्या चौकशीतून बोगस शस्त्र परवाने वाटणाऱ्या टोळीची माहिती समोर आली होती. पंजाबमधील तरन तारन जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिक बलजित सिंग याचे नावही त्याच वेळी निष्पन्न झाले होते, परंतु तेव्हापासून तो फरार होता. मुंबई, ठाण्यातील काही व्यापाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांची बोगस सही करून शस्त्र परवाने दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. महाराष्ट्रासह पंजाब, तसेच जम्मू आणि काश्मिरातील अशाच प्रकारच्या टोळ्यांशी आरोपींचे लागेबांधे असल्याचेही तपासात समोर आले होते. गत दीड वर्षापासून फरार असलेला बलजित सिंग अमृतसरमध्ये असल्याची माहिती ठाण्याच्या गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार, सहायक पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी आणि इतर कर्मचाऱ्यांचे पथक बलजितच्या अटकेसाठी अमृतसरला गेले होते. बलजितला बेड्या ठोकून न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. बलजितच्या अटकेने या प्रकरणात आतापर्यंत अटक आरोपींची संख्या १५ झाली आहे. या आंतरराज्य टोळीकडून ज्यांनी बोगस शस्त्र परवाने घेतले, त्यांचीही चौकशी केली जाणार आहे. त्यापैकी जे परवानाधारक टोळीच्या कारनाम्यांबाबत अनभिज्ञ असल्याचे चौकशीमधून स्पष्ट होईल, त्यांचा या प्रकरणात साक्षीदार म्हणून वापर केला जाईल. (प्रतिनिधी)