आंदोलनातील समाजकंटकांना खड्यासारखे बाजूला काढा- चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:48 AM2018-07-25T00:48:44+5:302018-07-25T00:49:16+5:30
आंदोलनात काही समाजकंटक शिरले असून, त्यांना मराठा नेत्यांनी खड्यासारखे बाजूला काढा, असे आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत केले
सांगली : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकार आग्रही आहे. आरक्षणाबाबत सरकारच्या हातात जे आहे, ते सारे काही केले आहे. आता जलसमाधी, आंदोलन करून आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. मंत्र्यांच्या गाड्या फोडून आरक्षण मिळणार असेल तर, तुम्ही गाड्या फोडा. आंदोलनात काही समाजकंटक शिरले असून, त्यांना मराठा नेत्यांनी खड्यासारखे बाजूला काढा, असे आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी सांगलीत केले.
मराठा आरक्षणासंदर्भात राज्यभर आंदोलन सुरू आहे. काकासाहेब शिंदे या तरुणाने सोमवारी जलसमाधी घेतली. त्यासंदर्भात महसूलमंत्री पाटील म्हणाले, शिंदे यांच्या जलसमाधीची घटना दु:खद आहे. सरकारने आरक्षणाबाबत जे काही करता येईल ते केले आहे. अंमलबजावणीत काही त्रुटी असतील तर कडकपणा आणता येईल. मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शुल्कामध्ये ५० टक्के सवलत दिली आहे. दहा लाखांपर्यंतच्या कर्जावरील व्याजही सरकार भरणार आहे. ज्या संस्था ५० टक्के शुल्कामध्ये प्रवेश देणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
न्यायालयाने मागासवर्गीय आयोगाकडून अहवाल मागविला आहे. दोन महिन्यात तो येईल. तो सरकार जसाच्या तसा स्वीकारून न्यायालयात सादर करणार आहे. त्यामुळे मराठा समाजाने थोडा धीर धरला पाहिजे. हिंसक घटना थांबविल्या पाहिजेत. समाजाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी. असेही त्यांनी सांगितले.
चर्चेची दारे खुली
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार आग्रही आहे. मराठा समाजानेही शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे. कुठेही गालबोट लागू देऊ नये.
- रावसाहेब दानवे, भाजप प्रदेशाध्यक्ष
हिंमत असेल तर प्रथम माझ्यावर गुन्हा दाखल करा
आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा समाजाचा संयम सुटलेला असून याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे. सिंधुदुर्गमधील मराठा तरूणांना पोलीसांमार्फत नोटीसा पाठवून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत आहेत. हिंमत असेल तर पहिल्यांदा माझ्यावर गुन्हा दाखल करा.
- आमदार नीतेश राणे