राधाकृष्ण विखे पाटील- राम शिंदे पहिल्यांदाच आमनेसामने; वाद मिटण्याची चिन्हे?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 02:28 PM2019-12-27T14:28:12+5:302019-12-27T14:28:59+5:30
देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही नगर जिल्ह्याची बैठक झाली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील गैरहजर होते. सुमारे तासभर ही बैठक झाली. यानंतर आधी खासदार सुजय विखे-पाटील नंतर राधाकृष्ण विखे बाहेर पडले.
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मंत्री राम शिंदे यांनी राधाकृष्ण विखे पाटलांमुळे पराभव झाल्याचा आरोप करत पक्षाकडे तक्रार केली होती. आज भाजपाची राज्यस्तरीय बैठक झाली यामध्ये त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर व्यथा मांडल्या. यावेळी विखे पाटील पिता-पूत्रही हजर होते. या बैठकीतील चर्चेवर बोलण्यास विखे पाटलांनी नकार दिला, तसेच ते अधिकार राम शिंदेना दिल्याचे म्हटल्याने वजन कोणाच्या पारड्यात पडले याची चर्चा रंगली आहे.
फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही नगर जिल्ह्याची बैठक झाली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील गैरहजर होते. सुमारे तासभर ही बैठक झाली. यानंतर आधी खासदार सुजय विखे-पाटील नंतर राधाकृष्ण विखे बाहेर पडले. त्यांनी उद्या नगर जिल्ह्यातील जिल्हापरिषद निवडणुकीसाठी पक्षाची बैठक होणार असल्याचे सांगत बैठकीचा वृत्तांत राम शिंदे सांगतील असे सांगितले.
राम शिंदे यांनी विखे पाटलांवर पाडापाडीचे राजकारण केल्याचा आरोप केला होता. यामुळे त्यांच्यावर पक्षाने कारवाई करावी अशी भूमिका त्यांनी घेत नाराजी व्यक्त केली होती. मात्र, बैठकीतून बाहेर आल्यानंतर त्यांनी पक्षाने घेतलेल्या अॅक्शनवर समाधानी असल्याचे म्हटले. विखे आणि मी पहिल्यांदाच समोरासमोर बसलो. पक्षाच्या प्रमुख्यांकडे एकमेकांना आलेले अनुभव मांडले. त्यांनी यावर पक्ष निरिक्षकांना अहवाल देण्यास सांगितले आहे. त्यांच्या अहवालानंतर कोणाला समज द्यायचा, कोणावर काय कारवाई होईल याबाबत ठरविले जाईल. पण महाराष्ट्र विकास आघाडीला रोखण्यासाठी दोघांनी एकत्र येणे हिताचे असल्याचे सांगितले गेले. यामुळे येत्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उद्या नगर जिल्ह्यात बैठक होणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
तत्पूर्वी सुजय विखे यांनी माझी आई अद्यापही काँग्रेसमध्ये असल्याचे वक्तव्य केले होते. त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत. यावर शिंदे यांना छेडले असता त्यांनी सावध उत्तर दिले. त्या काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या असल्याने सुजय यांनी असे म्हटले असेल, असे शिंदे म्हणाले. तर राधाकृष्ण विखे पाटलांनी सुयजने काय सांगितले ते मला माहित नाही, असे सांगत प्रश्नाला बगल दिली.