राज ठाकरेंच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचे मोबाईल गेटवरच काढले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2019 03:45 PM2019-06-02T15:45:09+5:302019-06-02T15:55:22+5:30
राज यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील अशोकनगर येथे तीन दिवसीय शहरातील विधानसभा मतदारसंघ निहाय अध्यक्ष आणि पदाधिकारी यांच्या बैठकीला सकाळपासून सुरुवात झाली आहे.
पुणे - लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच पक्षांनी विधानसभेची तयारी सुरु केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा आपले दौरे सुरु केले आहे. आजपासून ते पुण्याच्या तीन दिवसीय दौऱ्यावर असून, पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आहे. मात्र यावेळी या बैठकीला येणार्या प्रत्येक पदाधिकाऱ्याचा मोबाईल फोन गेटवर जमा करण्यात येत आहे. बैठकीतील माहिती आणि व्हिडिओ प्रसार माध्यमांना मिळता कामा नये. याबाबतची खबरदारी घेतली जात असल्याचे बोलले जात आहे.
'लाव रे तो व्हिडिओ'च्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप पक्षाची पोलखोल करत राज ठाकरेंनी राज्यातील विविध भागात सभा घेतल्या होत्या. मात्र याचा कोणताही फरक विरोधकांच्या मत पेटीत होताना दिसला नाही. उलट भाजप-शिवसेना उमेदवार प्रचंड मतांनी निवडून आले. त्यांनतर आता राज ठाकरे विधानसभेच्या तयारीला लागले आहे. राज यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील अशोकनगर येथे तीन दिवसीय शहरातील विधानसभा मतदारसंघ निहाय अध्यक्ष आणि पदाधिकारी यांच्या बैठकीला सकाळपासून सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, बैठकीला येणार्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांचे मोबाईल फोन गेटवर जमा करण्यात आले आहे. तर, प्रसारमाध्यमांना देखील आतमध्ये प्रवेश देण्यात आला नाही. मनसैनिकांना दिलेले कानमंत्र, याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना मिळता कामा नये असे आदेश राज यांच्याकडून देण्यात आले आहे.
पुण्यातील बैठकीत राज ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय परिस्थितीचा आढावा घेणार आहे. विधानसभेच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी राज ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रचा दौरा करणार असून विविध जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार असल्याचे बोलले जात आहे.