देशात अप्रत्यक्ष आणीबाणी, राज ठाकरेंनी साधला पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 06:01 AM2017-09-02T06:01:55+5:302017-09-02T06:02:47+5:30
देशात सध्या अप्रत्यक्ष आणीबाणी लागू झाल्याचे चित्र आहे. इंदिरा गांधी यांनीही असाच प्रयत्न केला, तेव्हा जनसंघाने त्याला विरोध केला होता. आता बहुधा भाजपाला इंदिरा गांधी यांची भूमिका योग्य वाटत असावी, अशा शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला
मुंबई : देशात सध्या अप्रत्यक्ष आणीबाणी लागू झाल्याचे चित्र आहे. इंदिरा गांधी यांनीही असाच प्रयत्न केला, तेव्हा जनसंघाने त्याला विरोध केला होता. आता बहुधा भाजपाला इंदिरा गांधी यांची भूमिका योग्य वाटत असावी, अशा शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. राजकीय फायद्यांसाठी चुकीचे पायंडे पाडले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दादर येथील ब्राह्मण सेवा मंडळाच्या सभागृहात गणेशोत्सवानिमित्त राज ठाकरे यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. ‘लोकमत’चे वरिष्ठ सहाय्य संपादक संदीप प्रधान आणि
ज्येष्ठ पत्रकार उदय तानपाठक यांनी विविध विषयांवर राज ठाकरे यांना बोलते केले. अलीकडेच अतिवृष्टीमुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले होते. याबाबत विचारले असता टक्केवारीच्या राजकारणामुळे मुंबईचा विचका झाला आहे. मुंबईत महापालिकेसह आठ ते नऊ यंत्रणा कार्यरत आहेत. त्यांच्यात अजिबात समन्वय नाही. या यंत्रणांमध्ये समन्वय आवश्यक असल्याची भूमिका विलासराव देशमुखांच्या काळापासून मांडल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छ भारत अभियान राबवणाºया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी मुंबई महानगरपालिका आणि मंत्रालयातील साफसफाई करावी, असा टोलाही त्यांनी लगावला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अलीकडेच राज ठाकरे यांची भेट घेतली होती. अल्पसंख्याक दर्जा नसलेल्या शाळांच्या प्रश्नांवर त्यांच्याशी चर्चा झाली. आधी याबाबत सरकारशी बोललो; परंतु मार्ग न निघाल्याने भागवतांशी चर्चा केल्याचे राज यांनी सांगितले.
सरकारी नियमांचा आधार घेत अल्पसंख्याक दर्जा नसलेल्या शाळांमध्ये अल्पसंख्याक मुले येतात. त्यानंतर या शाळांमधील राष्ट्रगीत किंवा सरस्वती वंदनेसारख्या गोष्टींना विरोध सुरू होतो. राष्ट्रगीत सुरू झाल्यावरही मुले आणि त्यांचे पालक शाळेबाहेर उभे असतात. हा प्रकार चुकीचा आहे. एकीकडे अल्पसंख्याक शाळांना कसलेच नियम नाही आणि दुसरीकडे इतर शाळांमध्ये असे प्रकार घडत असल्याबद्दल राज यांनी नाराजी व्यक्त केली.
फक्त मतांसाठी काही राजकीय पक्षांनी महाराष्ट्रातील एकोपा घालविला आहे. आधी महापुरुष जातीत विभागले होते; आता देवांचीसुद्धा विभागणी झाली आहे, असे सांगून ते म्हणाले, महाराष्ट्रातील मुलामुलींना नोकºया दिल्यास आरक्षणाची गरजच भासणार नाही. मोर्चा वगैरेंनी काही होणार नाही. काही लोकांना त्याचे राजकारण करायचे असल्याची टीकाही राज यांनी केली.
भाजपा आणि मनसे एकत्र येणार का, या प्रश्नावर आधी त्यांना डोळा तरी मारू द्या. त्यांचा काय प्रस्ताव येतो हे पाहिल्याशिवाय काय बोलणार, असे उत्तर राज ठाकरे यांनी दिले. मनसे-शिवसेना एकत्र येणार का, या प्रश्नावर गणपती बाप्पाकडे पाहत परमेश्वरालाच माहीत, असे उत्तर राज यांनी दिले.