गुप्तहेर रजनी पंडित न्यायालयीन कोठडीत, बेकायदेशीर सीडीआर प्रकरण; चार आरोपी अद्याप फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 03:07 AM2018-02-12T03:07:21+5:302018-02-12T03:08:12+5:30
बेकायदेशीर सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणात अटकेत असलेल्या देशातील पहिल्या महिला गुप्तचर रजनी पंडित यांची रविवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. या प्रकरणातील चार आरोपी अद्याप फरार आहेत.
ठाणे : बेकायदेशीर सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणात अटकेत असलेल्या देशातील पहिल्या महिला गुप्तचर रजनी पंडित यांची रविवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. या प्रकरणातील चार आरोपी अद्याप फरार आहेत.
मोबाइल नंबरचा सीडीआर बेकायदेशीरपणे मिळवून तो १० ते १२ हजार रुपयांमध्ये विकणा-या टोळीचा पर्दाफाश गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक १ने गत महिन्यात केला. या प्रकरणी आतापर्यंत रजनी पंडित आणि काही खासगी गुप्तहेरांसह ९ आरोपींना पोलिसांनी अटक केली. रजनी पंडित वगळता उर्वरित आठ आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत.
पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पंडित यांना रविवारी ठाणे न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या प्रकरणातील काही आरोपींचा शोध अद्याप सुरू आहे. त्यांची माहिती काढण्यासाठी रजनी पंडित यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकार पक्षातर्फे या वेळी करण्यात आली. रजनी पंडित यांनी या प्रकरणातील आरोपी समरेश झा याच्याकडून सीडीआर विकत घेतले होते. ते पंडित यांनी कुणाकुणाला पुरवले याचा तपास करण्यासाठीही पोलीस कोठडीची गरज असल्याचा युक्तिवाद सरकार पक्षातर्फे करण्यात आला. पंडित यांच्या वकिलाने सरकार पक्षाच्या युक्तिवादावर आक्षेप घेतला. जवळपास आठ दिवसांपासून पंडित पोलीस कोठडीत होत्या. त्यादरम्यान पोलिसांनी तपासामध्ये कोणतीही प्रगती केली नाही. पंडित यांच्याविरुद्ध पोलिसांकडे ठोस पुरावाही नाही. याशिवाय त्यांचे वय आणि उच्च रक्तदाब तसेच मधुमेहासारखे आजार पाहता पंडित यांना पुन्हा पोलीस कोठडी सुनावण्यास बचाव पक्षाने विरोध केला. बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.
पोलिसांचीही चौकशी होणार?
सीडीआर प्रकरणात काही पोलिसांचा सहभाग समोर येण्याची शक्यता तपास अधिकाºयांनी वर्तविली. आरोपींनी बेकायदेशीररीत्या मिळवलेल्या काही सीडीआरचा वापर खंडणी उकळण्यासाठीही झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. त्यादृष्टीने तपास सुरू असून, पोलिसांचा सहभाग आढळल्यास त्यांचीही चौकशी केली जाईल, असे वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी सांगितले.
मुख्य आरोपीला लवकरच बेड्या
दिल्ली येथील सौरव साहू हा सीडीआर प्रकरणाचा सूत्रधार असल्याचे आतापर्यंतच्या तपासातून उघडकीस आले आहे.
ठाणे पोलिसांचे पथक त्याच्या अटकेसाठी दिल्ली येथे जाऊन आले. पोलिसांनी केलेल्या दिल्ली वारीमध्ये सौरव साहूला अटक करण्यात यश आले नसले तरी त्याला जाळ्यात अडकवण्यासाठी पुरेशी तयारी केली असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. लवकर सौरव साहूला बेड्या ठोकण्यात यश मिळेल, असा दावाही पोलिसांनी केला.