राणेंच्या रक्तातच गद्दारी, स्वाभिमान पक्षाला भवितव्यच नाही : वैभव नाईक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2017 06:22 PM2017-12-08T18:22:19+5:302017-12-08T18:22:48+5:30
नारायण राणे यांच्या रक्तातच गद्दारी व लाचारी असल्यामुळे त्यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला भवितव्य नाही. स्वाभिमान पक्ष फक्त नावापुरताच आहे, असा आरोप शिवसेनेचे आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी केला. येथील आपल्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कणकवली : नारायण राणे यांच्या रक्तातच गद्दारी व लाचारी असल्यामुळे त्यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला भवितव्य नाही. स्वाभिमान पक्ष फक्त नावापुरताच आहे, असा आरोप शिवसेनेचे आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी केला. येथील आपल्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
गेली २५ वर्षे नारायण राणे यांना आपण ओळखतो. त्यांच्या रक्तारत गद्दारी व लाचारी असल्याचे गेल्या वर्षभरातील घटनांवरून दिसून येते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राणे यांना कोकणचे नेते म्हणून म्हणून मुख्यमंत्री केले. पण तेच राणे शिवसेनेवर उलटले. ते काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसमध्ये जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करायला लागले. राणेंइतकी लाचारी कोकणातील दुस-या कोणत्याही नेत्यामध्ये नाही. कोकणात अनेक मोठे नेते होऊन गेले. राणे इतका लाचार दुसरा नेता पाहिला नाही, असा आरोप त्यांनी केला.
मुख्यमंत्र्यांनी उध्दव ठाकरे यांना विचारूनच निर्णय घेतला आहे. शिवसेनेने राणे यांना आमदार करायला विरोध केल्यामुळे राणे यांच्या तीळपापड झाला आहे. नीतेश राणे यांनीही काँग्रेसशी गद्दारी केली आहे. त्यामुळे नीतेश राणे यांनी प्रथम आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी नाईक यांनी यावेळी केली. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू झालेले आहे. महामार्गाच्या एका बाजूने सिमेंट काँक्रीट होणार आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी होईल, अशी माहिती नाईक यांनी दिली.
माडी विकणारे व संचयनीच्या प्रकरणात तुरुंगात असणारे आलिशान गाड्यातून फिरत आहेत. आम्ही कर्ज काढून गाडी घेतली आहे. माडी विकणारे व संचयनी प्रकरणी अटकेत असलेल्यांकडे आलिशान गाड्या कशा आल्या, असा सवाल नाईक यांनी केला. विधानसभा निवडणुकीत १२ जीप गाड्या कुठल्या पक्षातून आणल्या होत्या, असा सवाल त्यांनी केला.
लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी नारायण राणे काहीही वक्तव्य करीत आहेत. त्यांनी निवडणुकीच्या दरम्यान सुरू केलेले कारखाने बंद पडले आहेत. महिला उद्योगातून कारखाने काढले तेही सर्व बंद पडले. आम्ही कुडाळमध्ये भात प्रक्रिया गिरणी सुरू केली ती व्यवस्थित सुरू आहे. फिशरिजचा कारखाना सुरू केला तोही व्यवस्थित आहे, पण नारायण राणे यांनी सुरू केलेले कारखाने बंद पडले याची वैभव नाईक यांनी आठवण करून दिली.
उद्धव ठाकरेंनी ठरवले तर राणे आमदार
शिवसेनेचे २५ आमदार आपल्या संपर्कात असल्याचे राणे सांगत आहेत. शिवसेनेचा एकही आमदार फुटणार नाही आणि कुणीही त्यांच्या सोबत जाणार नाही. राणे यांनी लाचारी गहाण ठेवलेली आहे. स्वार्थासाठी ते कुणाबरोबरही लाचार होतील. शिवसेनेच्या ६३ आमदारांमुळे भाजपचे प्रसाद लाड विधान परिषद निवडणुकीत विजयी झाले. उध्दव ठाकरे यांनी ठरवले तरच राणे आमदार किंवा मंत्री होतील. शिवसेनेशिवाय ते मंत्री होऊच शकत नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कणकवलीवासीयांचे आभार-
कणकवली बंद ठेवायला नारायण राणे यांचा विरोध होता तरीही कणकवलीवासीयांनी कणकवली बंद ठेवून प्रशासनाचा विरोध केला. नारायण राणे यांना कणकवलीवासीयांनी किंमत दिली नाही, त्याबद्दल कणकवलीवासीयांचे अभिनंदन अशा शब्दात त्यांनी कणकवलीवासीयांबद्दल त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.