राम मंदिराचा मुद्दा जुनाच - रावसाहेब दानवे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2018 05:24 PM2018-11-25T17:24:19+5:302018-11-25T17:25:28+5:30

नोटिफीकेशन

Ram temple issue old - Raosaheb Danwe | राम मंदिराचा मुद्दा जुनाच - रावसाहेब दानवे

राम मंदिराचा मुद्दा जुनाच - रावसाहेब दानवे

Next

लातूर - जनतेला पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामावर विश्वास आहे. विकासामुळे जनतेला आणि पक्षालाही सध्या ‘अच्छे दिन’ आहेत. शिवसेनेने उपस्थित केलेला राम मंदिराचा मुद्दा जुना आहे. हा विषय निवडणुकीचा होऊ शकत नाही. परंतु, शिवसेनेचे हे धोरण असेल तर त्यांचे स्वागतच आहे, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी येथे रविवारी पत्रपरिषदेत व्यक्त केले.

खा. दानवे म्हणाले, १९९२-९३ मध्ये भाजपाने राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी शिवसेना आमच्यासोबत होती. आताही समविचारी पक्षासोबत युती करण्याची भाजपची तयारी आहे. राम मंदिर हा विषय हिंदूंच्या अस्मितेचा प्रश्न आहे. त्याकरिता सरकार योग्य भूमिका घेईल. परंतु, सध्या भाजपाचा विकासाचा अजेंडा आहे. त्यामुळे राम मंदिराचा विषय निवडणुकीचा होऊ शकत नाही. शिवसेनेने हा मुद्दा उपस्थित केल्याने आमची काहीच अडचण होणार नाही. त्यांचे स्वागतच आहे. 
पत्रपरिषदेला पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, खा.डॉ. सुनील गायकवाड, आ. विनायकराव पाटील, जिल्हाध्यक्ष नागनाथअण्णा निडवदे, शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, गणेश हाके, माजी आ. गोविंद केंद्रे, रमेश कराड आदींची उपस्थिती होती. 

मराठा समाजाला घटनादत्त आरक्षण 

राज्य मागासवर्गीय आयोगाने मराठा समाज मागास असल्याचा अहवाल दिला आहे. त्यामुळे आता या समाजाला स्वतंत्र १६ टक्के आरक्षण देण्यासाठी कसलीच अडचण येणार नाही. आयोगाने अहवाल दिल्याने आरक्षण आता घटनादत्त होईल. शिवाय, भारतीय जनता पार्टी असा एकमेव पक्ष आहे, या पक्षाने मराठा समाजाला इतर आरक्षणाला धक्का न लावता १६ टक्के आरक्षण देण्याचा ठराव केला असल्याचे खा. दानवे म्हणाले.

विरोधकांच्या पोटात भीतीचा गोळा 
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विश्वासार्हता संपलेली आहे. भाजप देशात आणि राज्यात एक नंबरचा पक्ष आहे. त्यामुळे विरोधकांच्या पोटात आता भीतीचा गोळा उठला आहे. राज्य व केंद्र सरकारने जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणावरून ओबीसी व मराठा समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होतोय, असा आरोपही दानवे यांनी केला. 

वन बूथ.. २५ यूथ 
राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात आणि २८८ विधानसभा मतदारसंघांत वन बूथ २५ यूथ अशी बांधणी करण्यात आली आहे. बूथ प्रमुखांसह ९२ हजार यूथची बांधणी केली आहे. त्यापैकी ८३ हजार यूथचे प्रशिक्षण झाले आहे. या कामाचा आढावा घेण्यासाठी ४८ लोकसभा मतदारसंघांत भाजपचा दौरा सुरू आहे. लातूरचा चौथ्या टप्प्यातील दौरा आज होत असून, त्यानंतर हिंगोली, परभणी जिल्ह्याचा होणार असल्याचे खा. दानवे यांनी सांगितले.

Web Title: Ram temple issue old - Raosaheb Danwe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.