रस्त्यांवरील खड्ड्यांभोवती रांगोळी
By admin | Published: July 19, 2016 04:12 AM2016-07-19T04:12:50+5:302016-07-19T04:12:50+5:30
शहर व उपनगरांतील प्रमुख मार्गांवरील खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत.
मुंबई : शहर व उपनगरांतील प्रमुख मार्गांवरील खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यांच्या दुरुस्तीकडे पालिका प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाचा निषेध रविवारी वडाळा येथे अनोख्या पद्धतीने करण्यात आला. खड्ड्यांभोवती रांगोळी काढून मनसेने अधिकारी व लोकप्रतिनिधींचा निषेध केला.
वडाळा परिसरातील वाल्मिकी चौक, विद्यालंकार मार्ग, दोस्ती रोड आणि बरकत अली नाका या रस्त्यांची अवस्था गेल्या महिनाभरापासून अत्यंत दयनीय आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर तर या रस्त्यांची अगदी चाळण झाली आहे. त्यामुळे या परिसरात अनेक शाळा आणि महाविद्यालये आहेत. त्यामुळे दिवसरात्र या मार्गावर नेहमीच मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अशातच येथील रस्ते पूर्णपणे खराब झाल्याने सध्या या ठिकाणी नेहमीच वाहतूककोंडी पाहायला मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी उशीर होतो. रस्त्यांवरील या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागतो आहे. संतापलेल्या वडाळा येथील मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज खड्ड्यांभोवती रांगोळी काढून पालिकेचा निषेध केला. (प्रतिनिधी)