महाराष्ट्र केसरीपेक्षा हिंद केसरी व्हायला आवडेल; शरद पवारांविरोधात जानकरांनी थोपटले दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 03:29 PM2019-02-14T15:29:46+5:302019-02-14T16:03:12+5:30
जानकरांचं शरद पवारांना खुलं आव्हान
मुंबई: भाजपानं जागा सोडल्यास शरद पवारांविरोधात निवडणूक लढवायला तयार असल्याचं म्हणत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दंड थोपटले आहेत. महाराष्ट्र केसरी होण्यापेक्षा हिंद केसरी व्हायला मला जास्त आवडेल, अशा शब्दांमध्ये जानकरांनी पवार यांना थेट आव्हान दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार माढा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची दाट शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर जानकर यांनी पवारांना आव्हान दिलं आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत बारामतीमधून सुप्रिया सुळेंना आव्हान देणाऱ्या जानकर यांनी आता शरद पवारांविरोधात निवडणूक लढवण्यास उत्सुक असल्याचं म्हटलं. 'मी बारामती आणि माढामधून निवडणूक लढवण्यासाठी अर्ज दिला आहे. बारामतीत यंदा कमळ फुलेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. मात्र पाच मिनिटांच्या मुलाखतीत हा मतदारसंघ मिळवू. मुख्यमंत्री आमचं म्हणणं ऐकतील याची खात्री आहे,' असंदेखील जानकर म्हणाले.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडे सहा जागांची मागणी करणार असल्याचं जानकर यांनी सांगितलं. गेल्या लोकसभा निवडणुकीत जानकर यांनी बारामतीमधून सुप्रिया सुळे यांना कडवी टक्कर दिली होती. जानकर यांनी भाजपाच्या चिन्हावर ही निवडणूक लढवावी, असा आग्रह त्यावेळी भाजपाकडून करण्यात आला होता. मात्र जानकर यांनी रासपच्या कपबशी या चिन्हावर निवडणूक लढवली. मतमोजणीच्या सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये ते आघाडीवरदेखील होते. मात्र त्यानंतर सुळेंनी बाजी मारली.
माढा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशभरात काँग्रेसच्या बाजूनं वातावरण असताना शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी शरद पवार सोशलिस्ट काँग्रेसकडून रिंगणात होते. मात्र सहानभूतीची लाट असूनही काँग्रेसला हा मतदारसंघ जिंकता आला नव्हता. आताही हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच आहे. विजयसिंह मोहिते-पाटील या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात.