पुणे शहराचं नाव जिजापूर करा; संभाजी ब्रिगेडची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 09:13 AM2018-11-12T09:13:37+5:302018-11-12T09:34:12+5:30
नामांतरासाठी संभाजी ब्रिगेडचं राज्य सरकारला पत्र
पुणे: पुणे शहराला जिजापूर नाव देण्यात यावं, अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे. यासाठी संभाजी ब्रिगेडनं राज्य सरकारला पत्र लिहिलं आहे. पुण्याला जिजाऊंनी ओळख दिली. त्यामुळे शहराला त्यांचं नाव देण्यात यावं, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडनं घेतली आहे. यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.
पुणे शहर वसवण्यात जिजाऊंचा मोठा वाटा होता. त्यामुळे पुणे शहराचं नाव बदलून ते जिजापूर करण्यात यावं, अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे. 'पुण्याला जिजाऊंचा वारसा आहे. पुण्याला जिजाऊंनी ओळख दिली. पुण्याला घडवण्यात त्यांचं योगदान अतिशय मोलाचं आहे. त्यामुळेच शहराचं नाव बदलून ते जिजापूर करण्यात यावं,' असं संभाजी ब्रिगेडनं राज्य सरकारला लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे.
भाजपा शिवरायांच्या आशीर्वादानं सत्तेत आला आहे. त्यामुळे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्रींचं नाव पुणे शहराला द्यावं, अशी विनंती संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देणार असल्याची माहितीदेखील शिंदे यांनी दिली.