एशियाटिकच्या पायऱ्यांचे नूतनीकरण सुरू

By admin | Published: April 30, 2017 03:57 AM2017-04-30T03:57:29+5:302017-04-30T03:57:29+5:30

हॉर्निमन सर्कल आणि एकूणच दक्षिण मुंबईमधील एक महत्त्वाची वास्तू म्हणून एशियाटिक सोसायटीच्या किंवा टाऊन हॉलच्या वास्तूकडे पाहिले जाते. नुकतेच एशियाटिकमधील

The renewal of Asiatic stages continues | एशियाटिकच्या पायऱ्यांचे नूतनीकरण सुरू

एशियाटिकच्या पायऱ्यांचे नूतनीकरण सुरू

Next

- ओंकार करंबेळकर,  मुंबई

हॉर्निमन सर्कल आणि एकूणच दक्षिण मुंबईमधील एक महत्त्वाची वास्तू म्हणून एशियाटिक सोसायटीच्या किंवा टाऊन हॉलच्या वास्तूकडे पाहिले जाते. नुकतेच एशियाटिकमधील काही सभागृहांचे नूतनीकरण पूर्ण करण्यात आले. आता या इमारतीच्या ऐतिहासिक पायऱ्यांचे नूतनीकरण करण्यात येत आहे. १८५८ साली व्हिक्टोरिया राणीने प्रसिद्ध केलेला जाहीरनामा याच पायऱ्यांवर वाचल्यामुळे या पायऱ्यांना मुंबईच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे.
२६ नोव्हेंबर १८०४ रोजी सर जेम्स मॅकिन्टोश यांनी स्थापन केलेल्या लिटररी सोसायटी आॅफ बॉम्बेची पहिली बैठक मुंबईमध्ये झाली. त्यानंतर, १८२३ साली लंडनमध्ये रॉयल एशियाटिक सोसायटी आॅफ ग्रेट ब्रिटन अ‍ॅण्ड आयर्लंडची स्थापना करण्यात आली. तर १८३० साली बॉम्बे ब्राँच आॅफ रॉयल एशियाटिक सोसायटी या नावाने त्याची मुंबईमध्ये शाखा सुरू करण्यात आली.
१८७३ साली त्यामध्ये बॉम्बे जिआॅग्राफिकल सोसायटी तर १८९६मध्ये अ‍ॅँथ्रापॉलॉजिकल सोसायटी आॅफ बॉम्बे विलीन करण्यात आली. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर रॉयल एशियाटिक सोसायटीपासून वेगळे होऊन एशियाटिक सोसायटी आॅफ बॉम्बेची निर्मिती करण्यात आली व २००२ साली त्याचे नाव ‘एशियाटिक सोसायटी आॅफ मुंबई’ करण्यात आले.

भव्य टाऊन हॉल
१८३३ साली टाऊन हॉलच्या भव्य इमारतीची बांधणी करण्यात आली. त्याचा आराखडा कर्नल थॉमस कोपर यांनी तयार केला होता. इमारतीच्या बांधकामावर ग्रीक आणि रोमन स्थापत्य शैलीचा मोठा प्रभाव दिसून येतो. या इमारतीचे बांधकाम इंग्लंडवरून आणलेल्या खास दगडांमधून करण्यात आले आहे. पायऱ्यांबरोबर समोरच दिसणारे आठ खांब या संपूर्ण वास्तूला भव्यता प्राप्त करून देतात आणि लक्षही वेधून घेतात. (या प्रकारच्या खांबांना ‘डोरिक कॉलम्स’ असे म्हणतात.) या इमारतीच्या पायऱ्यांवर अनेक चित्रपटांचे चित्रीकरणही करण्यात आले आहे.

१८५८ सालचा जाहीरनामा..
१८५७ साली झालेल्या बंडाचे पडसाद मुंबई प्रांतामध्येही उमटत होते. मात्र, मुंबई प्रांतातील झालेल्या उठावाच्या काही घटनांना आटोक्यात आणण्याचे काम मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर जॉन एलफिन्स्टन यांनी केले होते. १ नोव्हेंबर १८५८ रोजी क्वीन व्हिक्टोरियाज् प्रोक्लमेशन म्हणजे राणीने प्रसिद्ध केलेला जाहीरनामा भारतात वाचण्यात आला. मुंबईमध्ये एशियाटिक म्हणजेच टाऊन हॉलची इमारत ही भव्य आणि ब्रिटिश सत्तेची ताकद दाखवणारी असल्यामुळे या इमारतीच्या पायऱ्यांवर जाहीरनामा वाचण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळेस शहरातील काही प्रतिष्ठित नागरिकांनाही बोलावण्यात आले व सनदी नोकर तसेच गव्हर्नर जॉन एलफिन्स्टन्ही उपस्थित होते. या जाहीरनाम्यानुसार सर्व राज्य कारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून आपण हातात घेतल्याचे राणीने स्पष्ट केले आणि कायदा-सुव्यवस्था कायम राखण्याचे आश्वासन दिले होते.

तुम्हाला हे माहिती आहे का?
- ग्रामोफोनचे पहिले रेकॉर्डिंग या इमारतीमध्ये झाले.
- पहिली मॅट्रिक्युलेशन परीक्षा या हॉलमध्ये घेण्यात आली.
- आफ्रिकेचा शोध लावणाऱ्या डेव्हिड लिव्हिंगस्टोनचे व्याख्यान येथेच झाले.
- महात्मा गांधीजींच्या हत्येनंतर त्यांच्या अस्थी या इमारतीमध्ये दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या.

पायऱ्यांना स्वत:चे व्यक्तिमत्त्व
मोठ्या इमारतींद्वारे राज्याचे प्रशासक नेहमीच आपल्या सत्तेचे महत्त्व लोकांच्या मनामध्ये बिंबित करण्याचा प्रयत्न करत असतात. हॉर्निमन सर्कल हा परिसर तेव्हाचा बिझनेस डिस्ट्रिक्ट असल्यामुळे या परिसरात अनेक प्रशासकीय कार्यालये बांधण्यात आली. त्यानुसारच एशियाटिक म्हणजे टाऊन हॉलची बांधणी झाली. या इमारतीच्या पायऱ्या सर्वांचेच लक्ष वेधून घेतात, त्यांच्यामुळे केवळ इमारतीला नव्हे, तर सर्व हॉर्निमन सर्कलला एक देखणे रूप प्राप्त झाले आहे. या पायऱ्यांना स्वत:चे असे वेगळे व्यक्तिमत्त्व आहे. पायऱ्यांची दुरुस्ती झाल्यामुळे आता या सौंदर्यामध्ये आणखी भर पडेल. या पायऱ्यांचा ओपन थिएटरसारखा वापरही करण्यात येतो. एशियाटिक प्रत्येक महिन्याला विशेष व्याख्याने, प्रकाशने, कार्यक्रमांचे आयोजन करत असते. बदलत्या काळात दक्षिण मुंबईतील कार्यालये इतरत्र हलवली गेल्याने आणि एकूणच वेळेच्या अभावामुळे तरुण पिढीचे पाय एशियाटिककडे फारसे वळत नाहीत. पण तरुणांनी अधिकाधिक प्रमाणात येथे यावे, कार्यक्रमांना उपस्थित राहावे असे आम्हाला वाटते. एशियाटिकची इमारत केवळ पाहण्यासाठी नाही, तर ती अनुभवण्यासारखी आहे.
- संजीवनी खेर, उपाध्यक्षा, एशियाटिक सोसायटी आॅफ मुंबई.

Web Title: The renewal of Asiatic stages continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.