यंदाच्या गणेशोत्सवापासून नवभारत घडवण्यासाठी संकल्प करुया - देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2017 05:21 PM2017-08-25T17:21:30+5:302017-08-25T17:39:46+5:30
दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' निवासस्थानी गणपती बाप्पांचे आगमन झाले.
मुंबई, दि. 25 - दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' निवासस्थानी गणपती बाप्पांचे आगमन झाले. नेहमीच राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेल्या वर्षावर गणरायाच्या आगमनाने उत्साहाचे वातावरण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांची पत्नी अमृता आणि मुलगी दिविजा यांनी एकत्रित गणरायाची पूजा केली.
याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगभरातील गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या तसेच देश, महाराष्ट्र आणि शेतक-यावरची विघ्न बाप्पाने दूर करावी अशी प्रार्थनाही केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी नवभारताची संकल्पना मांडली आहे. त्यासाठी यंदाच्या गणेशोत्सवापासून प्रत्येक गणेशभक्ताने पुढच्या पाचवर्षांसाठी संकल्प करावा, त्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
मुख्यमंत्र्यांप्रमाणे त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी विनोद तावडे, पंकजा मुंडे तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेना नेते मनोहर जोशी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांच्या निवासस्थानीही गणेशमुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या होटगी रोड येथील नव्या निवासस्थानी मोठ्या आनंदात गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सहकुटुंब सहपरिवार करण्यात आली.
पालकमंत्री विजयकुमार देशमुख याच्या निवासस्थानी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
ढोलताशांच्या गजरात लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झाले. आता पुढील 12 दिवस गणरायाचेच अधिराज्य दिसणार असून सर्वत्र भक्ती आणि उत्साहाचे वातावरण असेल. घरघरात, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये जल्लोषात बाप्पांचं स्वागत करण्यात आलं. ढोल-ताशे, गुलाल, फुलांच्या उधळणीमध्ये बाप्पा घरोघरी आणले. मुंबईचा राजा अशी ओळख असणाऱ्या गणेश गल्लीचा राजा आणि नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या सिद्धिविनायकची प्राणप्रतिष्ठा पहाटेच करण्यात आली. बाप्पांची पहिली आरतीही संपन्न झाली.
सिद्धिविनायकाच्या आरतीला शिवमणी
तर दुसरीकडे गणेशचतुर्थीनिमित्त सिद्धिविनायकाची गणेशोत्सवातली पहिली आरतीदेखील झालेली आहे. गणेशचतुर्थीच्या दिवशी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी यावेळी मोठ्या प्रमाणात मंदिरात गर्दी केली होती. विशेष म्हणजे सिद्धिविनायकाच्या आरतीला साथ लाभली ती वाद्यांचा बादशाह असलेल्या शिवमणी यांची. शिवमणी यांनी यावेळी वाद्य वाजवून सिद्धिविनायकाची आरती केली. सिद्धिविनायक मंदिरात आज गणेशचतुर्थीनिमित्त विशेष तयारी करण्यात आली आहे. मंदिराच्या कळसासह संपूर्ण मंदिराची सजावट करण्यात आली आहे. मंदिराचा गाभाराही फुलांनी सजवण्यात आला आहे.
चला नवभारताच्या निर्माणासाठी संकल्पबद्ध होऊ या!#SankalpSeSiddhipic.twitter.com/WqTgRzxT54
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) 25 août 2017