रीमाचा चेहऱ्यातील मोहकपणा अखेरपर्यंत टिकून - जब्बार पटेल

By admin | Published: May 19, 2017 01:13 AM2017-05-19T01:13:50+5:302017-05-19T01:13:50+5:30

मोहन तोंडवळकर यांच्या नाटकात, रीमाला पहिल्यांदा पाहिले होते, त्या वेळेस ती १८-१९ वर्षांची असेल. त्या वेळी तिचे रंगभूमीवरील काम पाहून सगळेच थक्क झाले होते.

Rima's face resonant till the end - Jabbar Patel | रीमाचा चेहऱ्यातील मोहकपणा अखेरपर्यंत टिकून - जब्बार पटेल

रीमाचा चेहऱ्यातील मोहकपणा अखेरपर्यंत टिकून - जब्बार पटेल

Next

मोहन तोंडवळकर यांच्या नाटकात, रीमाला पहिल्यांदा पाहिले होते, त्या वेळेस ती १८-१९ वर्षांची असेल. त्या वेळी तिचे रंगभूमीवरील काम पाहून सगळेच थक्क झाले होते. नाटक मुरण्यापूर्वीच ती एखाद्या अनुभवी अभिनेत्रीसारखी सहज रंगमंचावर वावरत होती. त्यादरम्यान, ‘सिंहासन’ सिनेमासाठी नट-नट्यांचा शोध सुरू होता, याच सिनेमातून मराठी सिनेनाट्य सृष्टीला ‘रीमा’च्या रूपाने नवीन फ्रेश चेहरा मिळाला. या राजकीय पटात रीमाने केलेली भूमिका, तिच्या डोळ््यांतील भाव, तिचा अभिनय सगळ््यानेच वाहवा मिळविली. तिच्या चेहऱ्यात जो मोहकपणा होता तो तिने शेवटपर्यंत टिकवून ठेवला होता.
ती नाटकातून बाहेर आली, नंतर सिनेमेदेखील बंद केले. रीमाने गेली ७ ते ८ वर्षे सिनेमात काम करणे बंद केले होते. ती थकलीही होती, की आता काही वेगळी भूमिका करायला मिळत नाही म्हणून. तिने बहुतेक भूमिका नाकारल्या होत्या. आता किती वेळा आईची भूमिका करायची? नकोसे वाटते. त्यामुळे रीमाने त्याच त्याच भूमिका नाकारल्या; पण शेवटपर्यंत तिचा मोहकपणा जो होता तो तिने टिकवून ठेवला होता.
मराठी सिनेमात ती बऱ्यापैकी गाजली; पण हिंदी सिनेमात लोकांनी तिला जे घेतले ना त्याचे कारण असे की, फार कमी चेहरे असे असतात की, ज्यामध्ये एक प्रकारे चेहऱ्यांमध्ये पावित्र्याची भावना दिसते, असे खूप कमी चेहरे असतात. वास्तविक पाहता, ती हिंदी सिनेमात आली ना तर तिने प्रेमळ आई आणि मोठी बहीण, अशा भूमिका केल्या. हिंदी भूमिकेत तिला ‘खल’भूमिकांऐवजी, आईच्याच भूमिका मिळाल्या. आवाज, देहबोली अशा गुणाने सर्वगुण संपन्न होती. तिला भूमिकेची समज चांगली होती. मला ती सारखी म्हणायची की, ‘जब्बार मला तुझ्याबरोबर काम करायचे आहे. मला एखादे एकपात्री काम दे. मला आता चांगल्या भूमिका नाही मिळत,’ अशी ती म्हणायची. मी तिला म्हणायचो की, ‘तू आता भूमिकेचा नाद सोडून दे आणि एखादी कादंबरी घे आणि त्यात एकपात्री काही करता येईल असे कर, अशी प्रभावी भूमिका कर की, त्यात स्त्रीची अनेक रूपे दिसली पाहिजेत,’
नाटकात मी तिच्याबरोबर कामे केली नाहीत कारण, ती कमर्शियल नाटकात होती. पहिल्यांदा, ‘सिंहासन’ झाल्यानंतर बऱ्याच वर्षांनंतर ती हिंदी सिनेमात प्रचंड व्यस्त होती. तेव्हा ती म्हणाली की, ‘मला तुमच्या सिनेमामध्ये काम करायचे आहे.’ अतिशय वेगळ््या प्रकारची भूमिका होती. उच्चवर्गीय आणि दलित समाजातील मुलगा यांच्या प्रेमसंबंधांची गोष्ट आहे. अशा प्रभावी राजकीय कुटुंबातली मुलगी, अशी भूमिका होती. ती मुलगी एका आंदोलनकर्त्यां दलित मुलाच्या प्रेमात पडते. अशा भूमिकेसाठी रीमा ही एकमेव होती. तिच्या डोळ््यात प्रेमळपणा आणि करारीपणा दिसून येत होता. तिच्या गालाची जी उभारी होती त्यातच एक मूलत: करारीपण होते. तो हवा होता त्या भूमिकेसाठी. एक आव्हानात्मक असे होते, मी शिरवाडकरांच्या वरती एक चित्रपट केला ‘प्रवासी पक्षी’ नावाचा. त्यात स्वत: कुसुमाग्रज आहेत. दीड तासांची फिल्म आहे. तात्यासाहेबांच्या नाटकामधील एक भाग होता. ‘कौन्तेय’ नावाच शिरवाडकरांचे एक नाटक आहे. कौन्तेय नाटकाचा एक भाग मला करायचा होता. कौन्तेय म्हणजे, कुंतीचा मुलगा कर्ण. युद्धाच्या छावणीमध्ये कुंती हिला माहीत असते की, पाच पांडव आणि कौरवांच्या बाजूने उभा असलेला कर्ण याचे युद्ध अटल आहे. यामध्ये भाऊ भाऊच एकमेकांना मारणार आहेत. कुंतीला माहीत होते की, बाबा रे तूदेखील पाच पांडवांच्या पैकीच एक आहेस. हे रहस्य तिने इतकी वर्षे लपवून ठेवले होते. हे सांगायला युद्धाच्या छावणीत कर्णाच्या भेटीला कुंती येते, या प्रसंगाचा भाग आहे. जवळ-जवळ ७ ते ८ मिनिटांचा प्रसंग आहे. त्यामध्ये मला असे वाटले की, कुंतीची भूमिका ही रीमाच करू शकते. आता कर्ण कोण, तर विक्रम गोखले याला कर्णाची भूमिका देण्यात आली. तीन-चार दिवस सराव करून मग ते चित्रित करण्यात आले. यामध्ये अप्रतिम भूमिका रीमाने केलेली आहे.

- मुक्ता बर्वेने काढलेले नाटक ‘छापा काटा’ त्यामध्येही रीमाने अप्रतिम काम केले. तेव्हा ती म्हणाली की, असे काही फार कमी मिळते करायला. समारंभाच्या वेळी आम्ही भेटलो की, जेव्हा घरी जायच्या वेळेत आमच्या दोघांच्या गाड्या असतानाही, आम्ही एका कोणाच्या तरी गाडीने बोलत बोलत जायचो. कारण असे की, आता आम्ही मुंबईमध्ये राहतो, तर रीमा शास्त्रीनगरमध्ये राहते. तिथेच पुढच्या इमारतीमध्ये मी राहतो. ती मला एका ‘झी’च्या कार्यक्रमाला भेटली होती, तेव्हा आम्ही एकत्र आलो होतो. तेव्हा ती म्हणायची, ‘एखादी चांगली भूमिका असेल तर सांग, त्याच त्याच भूमिका नको वाटतात.’
- तिच्या प्रसन्न चेहऱ्याकडे पाहून मला कधी वाटलेही नाही की, ही बाई अशी अचानक निघून जाईल. आजारपणामुळे तिचे इतके हालही झाले नाहीत. बिचारी कोणालाही त्रास न देता गेली. तिच्या पहिल्या सिनेमाचा मी दिग्दर्शक होतो, याचा मला आनंद आहे.
- फार वेगळ््या स्वभावाची, वेगळ््या टॅलेंटची, अशी आगळी-वेगळी मुलगी होती. मला असे वाटते की, अजून १० वर्षे तरी तिच्या वाट्याला उत्तम नाटकांच्या भूमिका आल्या असत्या.
- नाटकापेक्षा रीमाने सिनेमात नक्कीच चांगल्या भूमिका केल्या असत्या. त्यामुळे एक चांगली अभिनेत्री आपण नक्कीच गमावलेली आहे. मी तिला ४० वर्षांपासून पाहतोय, तिला वाढताना आणि खुलताना पाहिलेले आहे.
- विशेष म्हणजे, तिने स्वत:च्या कर्तृत्वावर सगळे कमावले होते. या नटांचे मला प्रचंड कौतुक आहे. त्यातलीच एक रीमा लागू होती. अकाली जाणे जे असते ना, ते भयंकर त्रासदायक असते. याचा रीमा गेल्याने फार त्रास झाला. तिच्या मनातच राहिले चांगलं करण्यासारखे.
- तिच्यात इतके अभिनयाचे गुण होते, बुद्धिमत्ता होती, कल्पकता होती, सगळेच गुण होते. सुंदर आणि आकर्षक होती दिसायला. जर काही करायचे राहून गेले ना, तर याचे खूप वाईट वाटते. अशा गुणी कलांवताचे अकाली जाणे, हे त्रासदायक असते.

(शब्दांकन : सागर नेवरेकर)

Web Title: Rima's face resonant till the end - Jabbar Patel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.