म्यानमारचे रोहिंग्या मुस्लिम साखरी नाटेत आश्रयाला
By admin | Published: October 20, 2015 11:33 PM2015-10-20T23:33:54+5:302015-10-21T00:10:47+5:30
शोध मोहीम : ४३ नागरिक राहत असल्याचे निष्पन्न
जैतापूर : बौद्धधर्मीयांशी गेली २५ वर्षे सुरू असलेल्या वादामुळे म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लिम समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होत असून, त्यातील ४३ स्थलांतरित शरणार्थी रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील साखरी नाटे गावात आश्रयाला आले आहेत. गेल्या चार-पाच वर्षांत ते येथे दाखल झाले असून, मिळेल ते काम करून पोट भरत आहेत.
सागरी मार्गाने होणाऱ्या दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेवर नाटे सागरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्यावतीने परदेशी व्यक्तींची शोधमोहीम सुरू केली आहे. त्यानुसार मंगळवारी दिवसभरात तब्बल ४३ परदेशी व्यक्ती नाटे परिसरात राहात असल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्व व्यक्ती म्यानमारमधील असल्याचे पोलिसांनी सांगितले.
साखरी नाटे भागात मोठ्या प्रमाणावर मच्छिमारीचा व्यवसाय चालतो. रत्नागिरी जिल्ह्यात उत्पन्नामध्ये साखरी नाटे बंदराचा दुसरा क्रमांक लागतो. बोटचालकांना खलाशांची निकड मोठ्या प्रमाणावर भासते. स्थानिक पातळीवर खलाशी मिळेनासे झाल्याने नेपाळ येथून खलाशी आणले जातात. सध्या या बंदरात साडेचारशे यांत्रिकी नौका आहेत. यावरील सुमारे अडीच हजार खलाशी हे नेपाळ येथील आहेत. काही गावांमध्ये हापूस कलमांच्या बागेत रखवालदार म्हणून नेपाळ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
खलाशी म्हणून आणल्यानंतर त्याची पूर्ण माहिती संबंधित बोट मालकाने बंदर खाते व पोलीस ठाण्याला देणे आवश्यक असते. मात्र तसे घडत नाही. त्यामुळे त्याचा फायदा घेत दहशतवादी समुद्रमार्गे घुसखोरी करू शकतात, हे लक्षात घेऊन परदेशी व्यक्तींची शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. मंगळवारी साखरी नाटेत राबवण्यात आलेल्या या शोधमोहिमेत म्यानमार येथील ४३ व्यक्ती आढळल्या. हे लोक कोणामार्फत येथे आले, त्यांना आश्रय कोणी दिला, याचा तपास पोलीस करीत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी मारुती जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक मेघना बुरांडे हे कर्मचाऱ्यांसह मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून ही शोध मोहीम राबवित आहेत. (वार्ताहर)
कोण आहेत रोहिंग्या मुस्लिम
म्यानमारमध्ये बौद्धधर्मीय बहुसंख्येने राहतात. तेथे रोहिंग्या मुस्लिम समाजाचे लोक अल्पसंख्य म्हणून राहतात. बौद्धधर्मीय त्यांना स्थानिक मानण्यास तयार नाहीत.
त्यांच्यादृष्टीने रोहिंग्या मुस्लिम हे बंगाली आहेत आणि त्यांनी म्यानमारमध्ये बेकायदा स्थलांतर केले आहे. रोहिंग्या मुस्लिम समाजाच्या मते ते म्यानमारचे पूर्वरहिवासीच आहेत. १९९१पासूनच हा वाद सुरू आहे.
अलीकडच्या काळात लष्कराकडून रोहिंग्या मुस्लिमांवर अत्याचार वाढू लागल्याने त्यांनी स्थलांतर सुरू केले आहे. यातीलच काही लोक साखरी नाटे येथे आले आहेत.
मच्छिमारी बंदर बंद
मंगळवारी नाटे बंदरात व परिसरात शोधमोहीम राबविण्यात आल्याने बंदरातील मच्छिमारी पूर्णपणे बंद होती. ही मोहीम यापुढेही सुरू ठेवणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शरणागतीसाठी अर्ज केल्याच्या पावत्या
या परदेशी व्यक्तींपैकी काहीजणांकडे शरणार्थी म्हणून केंद्र सरकारचे ओळखपत्र उपलब्ध आहे, तर काहीजणांनी अशा ओळखपत्रासाठी अर्ज केल्याच्या पावत्या आहेत. त्यातील काहीजण २०११ पासून येथे रहात आहेत.