साहित्य संमेलन अध्यक्षपद निवडणूक ;राजन खान यांचा अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 04:16 AM2017-10-11T04:16:45+5:302017-10-11T04:17:15+5:30
बडोदा येथे होणा-या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी लेखक राजन खान यांनी मंगळवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला.
पुणे : बडोदा येथे होणा-या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी लेखक राजन खान यांनी मंगळवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. खान यांच्या अर्जावर सूचक म्हणून संजय भास्कर जोशी यांची, तर अनुमोदक म्हणून संतोष शेणई, संदेश भंडारे, भारत देसडला, रमेश राठीवडेकर आणि गोपाळ कांबळे यांच्या स्वाक्षºया आहेत.
खान म्हणाले, ‘‘संमेलनाध्यक्षपद एका वषार्साठी नव्हे तर आयुष्यभरासाठी असते. मी पूर्ण तयारीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे. तरीही कोणतेही आदरणीय, ज्येष्ठ नाव समोर आल्यास माघार घेण्याची माझी तयारी असेल.’’
लेखक, कार्यकर्ता म्हणून मी आजवर काम करत आलो आहे. लेखकाची ओळख मर्यादित असते. संमेलनाध्यक्षपदाला महाराष्ट्रात वलय, आदराचे स्थान आहे. त्यामुळे लेखकाच्या कामाला संमेलनाध्यक्षपदाच्या वलयाचा निश्चित उपयोग होतो. राज्यात, देशभरात अनेक छोटी संमेलने होत असली तरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. त्यामुळे संमेलनाकडे गांभीर्याने पहायला हवी. संमेलने खर्चिक होत आहेत, अशी टीका होत असली तरी साहित्याचा सोहळा दिमाखदार होत असेल तर तक्रार करण्यात अर्थ नाही. साहित्यासाठी खर्च झालेला पैसा कधीच वाया जात नाही. याउलट, खर्च काळानुसार वाढला पाहिजे, अशी टिपण्णी खान यांनी केली.