संभाजी भिडे समर्थकांचा सांगलीसह राज्यात मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 08:53 AM2018-03-28T08:53:05+5:302018-03-28T08:53:05+5:30
श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या सन्मानार्थ आज सांगलीसह राज्यभरात सन्मान महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
सांगली : श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या सन्मानार्थ आज सांगलीसह राज्यभरात सन्मान महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरेगाव-भीमा दंगलीत सहभागाबद्दल संभाजी भिडे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र संभाजी भिडे यांचा या घटनेशी काहीही संबंध नाही असा दावा करत शिवप्रतिष्ठानने सांगलीसह राज्यभरात सन्मान मोर्चाचे आयोजन केले. हा मोर्चा राज्यातील विविध जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडकणार आहे. मात्र, दुसरीकडे मुंबईत भायखळा ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात येणार होता, मात्र या मोर्चाला परवानगी दिलेली नाही. मात्र आझाद मैदानात सभेची परवानगी देण्यात आली आहे. तसेच, पुण्यात सुरक्षेचे कारण पुढे करत पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली आहे. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतही सकाळी 10 वाजता ओंकारेश्वर मंदिराजवळील नदीपात्रात जमून, लालमहालापर्यंत चालत जाण्याचा निर्णय श्री शिवप्रतिष्ठानने केला आहे.
सांगलीत सकाळी दहाच्या सुमारास कर्मवीर भाऊराव पाटील चौकातून या मोर्चाला प्रारंभ करण्यात येणार आहे. राम मंदिर चौक, काँग्रेस भवन, आझाद चौकमार्गे मोर्चा स्टेशन चौकात जाणार आहे. त्याठिकाणी निवेदन वाचन झाल्यानंतर मोर्चाचा समारोप होणार आहे.
भिडे गुरुजींना ‘क्लीन चिट’
कोरेगाव भीमा प्रकरणात संभाजी भिडे गुरुजींचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचा कुठलाही पुरावा हाती लागलेला नाही. शिवाय, ज्या महिलेने त्यांच्याविरोधात तक्रार केली होती तिनेच आपण भिडे गुरुजींना ओळखत नसल्याची साक्ष दिली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. तथापि, गुरुजींविरोधात काही नवे पुरावे आले असून त्याचा तपास करून आठ दिवसांत पुढील कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.