"एकनाथ शिंदेंना तुरुंगात टाकायचा भाजपाचा प्लॅन होता, तेव्हा...", संजय राऊतांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 12:10 PM2024-04-22T12:10:02+5:302024-04-22T12:12:28+5:30
Lok Sabha Election : ईडी आणि सीबीआय मागे लावून भाजपाच एकनाथ शिंदे यांना तुरुंगात टाकणार होते, असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे.
Sanjay Raut : मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या चार प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा कट महाविकास आघाडी सरकारने आखला होता, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका मुलाखतीत केला. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. ईडी आणि सीबीआय मागे लावून भाजपाच एकनाथ शिंदे यांना तुरुंगात टाकणार होते, असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे.
भाजपाने ईडी आणि सीबीआय मागे लावून एकनाथ शिंदे यांनाच जेलमध्ये टाकायचा प्लॅन केला होता. तेव्हा तुरूंगात जायला लागू नये, म्हणून ते कुठे-कुठे जाऊन रडले, हे तुम्ही त्यांना विचारा. भाजपामध्ये गेल्यावर त्या व्यक्तीला खोटं बोलण्याचं ट्रेनिंग दिलं जातं. भाजपामध्ये भ्रष्टाचारांना स्थान आहे किंवा खोटं बोलणाऱ्याला स्थान आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
याचबरोबर, ज्यांनी हिंदुत्व सोडलं, त्यांनी प्रचार गीतात जय भवानी शब्द तरी का आणावा? असा खोचक सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यावर संजय राऊत यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. तुमचं नमो नमो, घर घर मोदी चालतं. ते फडणवीस बोलतात तुम्हाला हिंदुत्वाचा नाव घेण्याचा अधिकार नाही. मगं तुम्हाला आहे का? शिवसेनेचा आणि हिंदुत्वाचा संबंध आहे, त्याच्या आसपासही भाजपा नाही. तुमचं व्यापारी हिंदुत्व आहे, नकली हिंदुत्व आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र सोडले.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना ठाकरे गटाच्या प्रचार गीतातून जय भवानी हा शब्द काढायला सांगितल्याने वाद निर्माण झाला आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही बदल करणार नसल्याचे म्हणत उद्धव ठाकरेंनी थेट निवडणूक आयोगालाच आव्हान दिले आहे. यावर संजय राऊत यांनीही भाष्य केले. निवडणूक आयोग ही भाजपाची शाखा आहे. दिल्लीमधील निर्वाचित आयोजित आहे, त्याचं नाव बदलून भाजपा निर्वाचन आयोग करणे गरजेचे आहे. हर हर महादेव या घोषणा देत आहेत, त्याला आतापर्यंत कोणी बंदी आणली नव्हती. काँग्रेसच्या राज्यात सुद्धा जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव याला बंदी नाही आणि नव्हती, असे संजय राऊत म्हणाले.
फडणवीसांसह चार नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा मविआचा 'प्लॅन' होता - मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या राज्यातील चार प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा कट महाविकास आघाडी सरकारने आखला होता, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये एकनाथ शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर असताना देवेंद्र फडणवीस यांच्यासह गिरीश महाजन, आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांच्याविरोधात खटले उभे करून त्यांना अटक करून तुरुंगात टाकण्याचा कट आखला होता. एवढंच नाही तर २०२४ च्या निवडणुकीपूर्वी भाजपाच्या आमदारांना फोडून आपल्याकडे वळवण्याचा डावही आखण्यात आला होता, असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला आहे.