VIDEO : सावरघर... पाच हजार झाडांचं एक गाव !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 06:08 PM2018-03-28T18:08:40+5:302018-03-28T18:40:35+5:30
ज्या गावात आजही पिण्याचं पाणी नाही, ओसाड माळरानावर फक्त कुसळं उगवत होती, तिथं आज पाच हजारांहून अधिक झाडं दिमाखात उभी राहिली आहेत. ही किमया क-हाड तालुक्यातील पुनर्वसित सावरघर या गावाने साध्य करून दाखविली आहे.
- अजय जाधव
उंब्रज (सातारा) - ज्या गावात आजही पिण्याचं पाणी नाही, ओसाड माळरानावर फक्त कुसळं उगवत होती, तिथं आज पाच हजारांहून अधिक झाडं दिमाखात उभी राहिली आहेत. ही किमया क-हाड तालुक्यातील पुनर्वसित सावरघर या गावाने साध्य करून दाखविली आहे. या गावात विविध प्रकारची तब्बल पाच हजार झाडे लावण्यात आली असून, ग्रामस्थांच्या एक तपापासून सुरू असलेल्या या पर्यावरणपूरक उपक्रमाला ख-या अर्थाने फळे येऊ लागली आहेत.
पाटण तालुक्यातील मुरुड येथे तारळी नदीवर धरण बांधण्यात आले. या धरणाच्या निर्मितीसाठी शासनाने परिसरातील अनेक गावांचे इतर ठिकाणी पुनर्वसन केले. त्यापैकी क-हाड तालुक्यातील चोरे गावालगत वसवण्यात आलेले सावरघर हे एक गाव. ओसाड माळरानावर वसवले असूनही या गावातील सर्व ग्रामस्थांनी ‘गाव करी ते राव काय करी’ या उक्तीप्रमाणे एकीच्या माध्यमातून हे माळरान हिरवेगार
केले आहे.
आजही या गावाला पिण्याचे हक्काचे पाणी मात्र उपलब्ध नाही. पुनर्वसन असल्यामुळे गावनिर्मितीसाठी प्लॉटची निर्मिती करताना शासनाने सर्व नियमाचे पालन केलेले आहे. यामुळे अंतर्गत रस्ते, गटार व्यवस्था, मोकळी जागा, यामुळे मिळालेल्या प्लॉटवर लोकांनी घरे बांधली. रिकाम्या जागेत झाडे जगवली. या गावाचा फक्त बेचाळीस घरांचा उंबरा. या गावची लोकसंख्या सुमारे २५० च्या दरम्यान. तारळे परिसर हा डोंगराळ; पण निसर्गाच्या सान्निध्यात असलेला भाग. पाणीदार व झाडाझुडपांमुळे कायमचा हिरवागार. अशा निसर्गाच्या सान्निध्यात जन्मलेल्या सावरघर ग्रामस्थांना या ओसाड माळरानावर राहणे अशक्य होते; पण त्यांनी हे पुनर्वसन स्वीकारले. हेच माळरान हिरवेगार करण्याचा चंग बांधला. शासनाच्या रोजगार हमी योजना, ग्रामपंचायतीचा पर्यावरण निधी व ग्रामस्थांनी स्वत:च्या खर्चातून गावातील
रस्त्यालगत, रिकाम्या जागेत झाडे लावण्यास सुरुवात केली.
गावातील प्रत्येक घर हे नियोजन बद्धच बांधलेले आहे. घराला अंगण व परसदारी आहे. या रिकाम्या जागेत फळझाडे आणि फुलझाडे लावलेली आहेत. यामध्ये आंबा, फणस, बदाम, पेरू, चिकू, डाळिंब, अंजीर, नारळ अंजीर, सीताफळ, रामफळ अशी फळझाडे आहेत व सुगंध देणारी फुलझाडेही लावलेली आहेत. अशा खासगी मालकीच्या जागेत सुमारे दोन हजार झाडे आज बहरलेली व हिरवीगार दिसत आहेत.
आता सर्वत्र उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत; पण ऐकेकाळी भकास व उजाड माळरान असलेल्या जागेतील या गावात आता प्रवेश करताच पक्ष्यांच्या किलबिलाटानेच स्वागत होत आहे. हिरवीगार सावली मन प्रफुल्लित करत आहे. मात्र आजही हे गाव चोरे ग्रामपंचायतीच्या मालकीच्या विहिरीवर पिण्याचे पाणी भरते. गाव हिरवेगार करणारे हे ग्रामस्थ मात्र गेली १६ वर्षे पिण्यासाठी हक्काचे पाणी मागत आहे; पण तारळी धरणाच्या पाण्यातून हजारो एकर जमीन ओलिताखाली येण्यासाठी स्वत:ची घरदार, जमीन जुमला त्याग करणा-या
या गावाला आजही हक्काचे पिण्याचे पाणी नाही. केवढी ही शोकांतिका. गावातील शिवगणेश मंडळ त्याचबरोबर सुहास पाटील, जगन्नाथ पाटोळे, परशूराम सपकाळ, अंकुश सप्रे, रामदास बाबर, नवनाथ बाबर, दिनकर संकपाळ, संतोष संकपाळ, राम जाधव यांसह ग्रामस्थांची पर्यावरण संवर्धनाची ही धडपड अखंडपणे सुरूच आहे.
संवर्धनाचे एक तप पूर्ण
दरवर्षी ५०० हून अधिक झाडे लावायची. ती जगवायची. हे ठरवूनच झाडे लावली जाऊ लागली. झाडे लावत असताना दोन झाडांमध्ये ठराविक अंतर सोडण्यात येत होते. यामुळे ही झाडे जगलीच; पण त्यामुळे शोभाही वाढली. सलग बारा वर्षे या ग्रामस्थांनी ही झाडे लावली व जगवलेली आहेत.
अशोक, शिवर, गुलमोहर वाढवतोय शोभा
रस्त्याच्या दोन्ही बाजूला गुलमोहर, रेनट्री, पाम, अशोक , शिवर, कडुनिंब, निलमोहर, निलगिरी, सप्तपर्णी अशी शोभेची झाडे लावण्यात आली आहेत. तसेच रानटी आणि सावली देणारी झाडे ही लावलेली दिसून येत आहेत.
ठिबकने दिले पाणी
या परिसरात उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची वानवा. त्यातच झाडांना पाणी कोठून आणायचे? हाच मोठा प्रश्न होता. परंतु यावर तोडगा काढून अनेकांनी ठिबक करून पाणी दिले. प्रत्येक ग्रामस्थ स्वत:च्या घरासमोर असणा-या झाडांच्या जगण्यासाठी धडपडत आहे. त्याला खतपाणी देत आहे. सार्वजनिक जागेतील मंदिर परिसरात लावलेल्या आंबा, नारळ यासारख्या फळझाडांना फळेही येऊ लागली आहेत.