पुरंदर तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई
By Admin | Published: April 5, 2017 01:18 AM2017-04-05T01:18:43+5:302017-04-05T01:18:43+5:30
पुरंदर तालुक्यात मार्च महिन्यातच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे.
पुरंदर तालुक्यात मार्च महिन्यातच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. आज सुमारे १६ हजार लोकसंख्येला ९ शासकीय टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असून आणखी ९ ग्रामपंचायतींचे टँकरची मागणीचे प्रस्ताव आल्याचे पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण यांनी सांगितले.
तालुक्यातील राख, वाल्हे, पिंपरी, एखतपूर, मुंजवडी साकुर्डे, जेजुरी ग्रामीण, बेलसर, दिवे या ग्रामपंचायतींच्या मागणीनुसार या गावांना टँकर सुरू करण्यात आले आहेत. या गावातील ४ गावठाण आणि ४० वाड्यावस्त्यांवरील सुमारे १५,९२१ लोकसंख्येला ९ शासकीय टँकरने २८ फेऱ्यांद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.
अजूनही सोनोरी, मावडी. क.प., बहिरवाडी, नावळी, घेरा पुरंदर, कुंभारवळण, भोसलेवाडी, कर्नलवाडी, राजुरी, निळूंज, सोमुर्डी नायगाव, टेकवडी, झेंडेवाडी या गावातील टँकरचे प्रस्ताव दाखल असून तालुक्यातील सुमारे २५ हजारांवर जास्त लोकसंख्येला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दररोज टँकरचे प्रस्ताव दाखल होत आहेत. याशिवाय उन्हाळा ही अत्यंत कडक असून तालुक्यातील केवळ सात जलाशयातच पाणी साठा शिल्लक आहे. इतरत्र गावोगावचे पाझर तलाव, लघु पाटबंधारे विभागाचे जलाशय कोरडे ठाणठणीत आहेत. गावोगावच्या पाणीपुरवठा योजनांचे जलस्रोतही आटलेले असल्याने ग्रामपंचायतींसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.
गेल्यावर्षी पुरंदर तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने पूर्व पुरंदरच्या पट्ट्यात आताच पिण्याच्या पाण्याची तीव्रटंचाई जाणवू लागली आहे, पश्चिम पट्ट्यातील सुमार पावसामुळे कऱ्हा नदीतून वाहिलेल्या पाण्यावर नाझरे जलाशयात केवळ ४० टक्केच (३८५ दशलक्ष घनफूट) पाणीसाठा होता. आज जलाशयात केवळ १३० दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध आहे. नाझरे जलाशयावरून सुमारे ५० गावांना पिण्याच्या पाण्याच्या प्रादेशिक योजना सुरू आहेत. या योजनांनाही दिवसाआड पाणी उचलण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. जलाशयावरून परिसरातून मागणी होऊनही उद्योग व्यवसायांना पाणीपुरवठा केला जात आहे. पुढील चार महीने पाणी पुरवण्याचे नियोजन केले असेल तर उद्योगांचे पाणी बंद करावे लागणार आहे. त्याचबरोबर तालुक्यातील गराडे केवळ १.१० दशलक्ष घनफूट, पिलानवाडी जलाशयात १२.६८ दशलक्ष घनफूट, वीरनाला ३३.८४. दशलक्ष घनफूट, घोरवडी १९.८८ दशलक्ष घनफूट, पिंगोरी ११.४० दशलक्ष घनफूट, पिसर्वे ५.९८ दशलक्ष घनफूट असा पाणी साठा आहे. या जलाशयावरून परिसरातील पाणी योजनांना पिण्याचे पाण्याचे नियोजन करण्यात आले असले तरी ही काही गावांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या ही तक्रारी वाढू लागल्या आहेत.
(वार्ताहर)
कऱ्हा नदीलगतच्या काही गावांना आज जरी पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत नसली तरी ही भविष्यात या ठिकाणी ही टँकर सुरू करावे लागणार आहेत. याशिवाय इतर गावांतूनही टँकरची मागणी वाढू लागली आहे. पुढील तीन ते चार महीने टँकरने पाणी पुरवठ्याचे नियोजन करावे लागणार आहे.
गेल्या १० वर्षांत यंदा तीव्र उन्हाळा आणि तीव्र पाणीटंचाई मार्च महिन्यातच जाणवू लागल्याने शेतकरी वर्ग हवालदील झाला आहे. स्वत:चा उदरनिर्वाह, पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या पाणी व चाऱ्याचा प्रश्न ही दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे.
अनेक लहान शेतकऱ्यांनी चाऱ्याअभावी जनावरे विकण्यास सुरुवात केली आहे. जनावरांच्या चारा पाण्यासाठीही नियोजनाची गरज आहे. छावण्या सुरू कराव्या लागतील, अशीच परिस्थिती निर्माण झाली असून तसे प्रशासकीय पातळीवरून प्रयत्न सुरू करावेत, अशी मागणी होऊ लागली आहे.