शाहू खासबाग कुस्ती मैदानात पुन्हा ‘शड्डू’ घुमणार
By admin | Published: January 5, 2015 12:20 AM2015-01-05T00:20:58+5:302015-01-05T00:42:55+5:30
नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात : संस्थानकालीन बाज राखण्याचा प्रयत्न
सचिन भोसले - कोल्हापूर -‘कुस्ती पंढरी’ची शान असलेल्या राजर्षी शाहू खासबाग कुस्तीचे मैदान नूतनीकरणासाठी गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. हे काम आता अंतिम टप्प्यात असून, ते फेबु्रवारीअखेर पूर्ण होणार आहे. त्यामुळे या मैदानात आता पुन्हा एकदा शड्डूचे आवाज घुमणार आहे.
राजर्षी शाहू महाराज ब्रिटनचा बादशहाच्या राज्यरोहणासाठी १९१२ मध्ये ब्रिटनला गेले होते. यादरम्यान त्यांनी रोम(ग्रीस)लाही भेट दिली. या भेटीत त्यांना आॅलिम्पिकचे स्टेडियम व ओपन थिएटर पाहण्याचा योग आला. त्यातूनच त्यांना कोल्हापुरात कुस्ती मैदान साकारण्याची कल्पना सुचली. महाराज ब्रिटनहून परत आल्यानंतर त्यांनी मिरजकर तिकटी येथील राजघराण्यातील माणसांसाठी खास राखून ठेवलेल्या बागेत अर्थात खासबागेत या मैदानाची संकल्पना व आराखडा ठरविला. त्याप्रमाणे रोम येथील मैदानाची प्रतिकृती खासबागेत उभारण्याचे काम १९१२ सुरू झाले. या कुस्ती मैदानाचे बांधकाम पाच वर्षांत पूर्ण झाले.
या मैदानाला २०१२ मध्ये शंभर वर्षे पूर्ण झाली म्हणून ‘हिंद केसरी’ स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यामध्ये हरियाणाच्या युद्धवीरने रोहित पटेल याच्यावर मात करीत ‘हिंद केसरी’ची गदा मिळवली. त्यानंतर डॉ. डी. वाय. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी मोठे मैदान झाले. त्यानंतर या मैदानाचा २ कोटी ९० लाखांचा नूतनीकरणाचा आराखडा महापालिकेने मंजूर केला. त्यानंतर नूतनीकरणामुळे गेल्या दोन वर्षांत या मैदानात एकही कुस्ती झालेली नाही. त्यामुळे कुस्तीशौकिन व मल्ल या ‘कुस्ती पंढरी’च्या मैदानापासून लांब होती. मात्र, नूतनीकरणानंतर हे मैदान साधारणत: येत्या मार्च महिन्यात कुस्ती स्पर्धांसाठी सज्ज होणार आहे.
संस्थानकालीन बाज राखण्याचा प्रयत्न
मैदानाच्या उत्तर, पश्चिम व दक्षिणेच्या बाजूंना २० फुटांची तटबंदी आहे. ७० फूट मैदानात उतरण केली आहे. १० फुटांचा गोलाकार पट्टा सोडला आहे. प्रत्यक्ष आखाडा ६० फूट व्यासाचा व जमीन पातळीपासून अडीच फूट उंचीचा आहे. रेलिंग, चारीबाजूंनी पैलवानांना कुस्तीसाठी आत येता येते. मैदानाबाहेर १० फुटांचा पट्टा ठेवला असून, यामध्ये आता खुर्च्या ठेवता येतील. संस्थानकालीन आराखड्यानुसार या कुस्ती मैदानाचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे.
पहिली कुस्ती
शाहू महाराजांनी १९१३ मध्ये या मैदानाचे काम सुरू असताना पहिली कुस्ती खलिफा गुलाम मोहिद्दीन विरुद्ध इमामबक्ष पैलवान यांच्यात लावली होती. त्यात इमामबक्ष पैलवान विजयी झाले.
मैदानातील गाजलेल्या कुस्त्या
७ एप्रिल १९२४ ज्ञानू माने विरुद्ध गुलमहमद कलावाला
२१ आॅक्टो १९३६
जगद्विख्यात जर्मन पैलवान व्हॉन केमर विरुद्ध मल्लापा तडाखे
१७ मार्च १९४० गामा पंजाबी विरुद्ध शिवगौडा मुत्नाळे
१३ मार्च १९७६ युवराज पाटील विरुद्ध विजयकुमार
१ एप्रिल १९७८ युवराज पाटील विरुद्ध सतपाल
१५ एप्रिल १९७८
दादू चौगुले विरुद्ध सादिक पंजाबी
१३ एप्रिल १९७९
विष्णू फडतारे विरुद्ध रामा माने,
दादू चौगुले विरुद्ध सतपाल
१६ एप्रिल १९८३
तारिक लाहोरवाला विरुद्ध बाळू पाटील
११ फेबु्रवारी १९८४
युवराज पाटील विरुद्ध सतपाल
लक्ष्मण वडार विरुद्ध बाळू पाटील
७ फेबु्रवारी १९८७
विष्णू जोशीलकर विरुद्ध नामदेव मोळे
११ फेबु्रवारी १९८९
गुलाब बर्डे विरुद्ध नामदेव मोळे
राजर्षी शाहू महाराजांनी अनेक देशी-विदेशी मल्लांना या खासबाग कुस्ती मैदानात आणून स्थानिक मल्लांबरोबर कुस्त्या लावल्या. मात्र, आज ही कुस्ती पंरपरा धोक्यात आली आहे. यापुढे शासनानेच वर्षातून किमान दोनवेळा जंगी कुस्त्यांचे मैदान या खासबागेत भरवावे तरच कुस्ती परंपरा टिकेल.
- श्रीपती खंचनाळे, पहिले हिंद केसरी
२ कोटी ९० लाखांचा आराखडा मंजूर असून, ३.२५ कोटींचे टेंडर या खासबाग कुस्ती मैदानाच्या नूतनीकरणासाठी आले होते. नूतनीकरणाचे ८५ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. साधारणत: फेबु्रवारी महिन्यापर्यंत हे मैदान पूर्ण होऊन कुस्तीसाठी मैदान खुले केले जाईल.
- अनुराधा वांडरे,
कनिष्ठ अभियंता, महापालिका