एक डिसेंबरला मराठा आरक्षण ही शुद्ध फसवणूक : शरद पवार यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 01:42 PM2018-11-24T13:42:52+5:302018-11-24T13:45:15+5:30
एक डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा ही शुद्ध फसवणूक आहे. मराठा व ओबीसी समाजांत दुही निर्माण करून निवडणुका जिंकण्याचे मुख्यमंत्र्यांचे दिवास्वप्न असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार
कोल्हापूर : एक डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा ही शुद्ध फसवणूक आहे. मराठा व ओबीसी समाजांत दुही निर्माण करून निवडणुका जिंकण्याचे मुख्यमंत्र्यांचे दिवास्वप्न असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केली. एक डिसेंबर फार लांब नाही; त्यामुळे किती जल्लोष होतो हे पाहूच, असा टोलाही पवार यांनी लगावला.
नातेवाइकांच्या विवाहानिमित्ताने पवार सहकुटुंब गुरुवार (दि. २२)पासून कोल्हापुरात आहेत. आज, शनिवारी रात्री ते कºहाडला जाणार आहेत. दुपारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘मराठा आरक्षणासंबंधी मुख्यमंत्री स्वच्छपणे कोणतेही माहिती देत नाहीत. कुणाचे तरी काढून घेऊन हे आरक्षण देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यातून मराठा विरुद्ध ओबीसी किंवा अन्य घटक यांच्यात वाद निर्माण करण्याची मुख्यमंत्र्यांची नीती आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने हे फार घातक आहे. त्याचा परिणाम राज्याच्या एकतेवर होईल. सरकारची ही पावले सामाजिक अभिसरण व मन उद्ध्वस्त करणारी आहेत. त्यांनी एक डिसेंबरला जल्लोष करण्याची केलेली घोषणा त्याच हेतूने केली आहे. सर्वच समाजांतील गरीब घटकांना आरक्षण देण्याची गरज आहे. त्या संदर्भात राजर्षी शाहू महाराजांनी १९१८ ला घेतलेली भूमिका जास्त व्यापक आणि वास्तवदर्शी आहे. शाहूंचा दृष्टिकोन सर्वांना बरोबर घेऊन जाणारा होता. मुख्यमंत्र्यांचा मात्र दुही माजविण्याचा आहे.’
राज्यात दोन्ही काँग्रेसची आघाडी होण्यात कोणतीच अडचण नाही. लोकसभेच्या ४१ जागांचे वाटपही झाले आहे. उर्वरित सहा-सात जागांबाबत काही आक्षेप आहेत. ते आम्ही एकत्र बसून संपवू, असे पवार यांनी यासंबंधीच्या प्रश्नावर स्पष्ट केले. भाजप व शिवसेना यांची युती होणार नाही, असे ते दोन पक्ष म्हणत असले तरी आमचा त्यावर विश्वास नसल्याची टिप्पणी पवार यांनी केली.
राणे, लोकसभा आणि राष्ट्रवादी...!
माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवणार असल्याच्या बातम्या दिल्याबद्दल वृत्तपत्रांचे मिश्किलपणे आभार व्यक्त करून पवार म्हणाले, ‘कोकणातील रायगडची एकच जागा आमच्या पक्षाकडे आहे. दुसरी काँग्रेसकडे आहे आणि राणे हे भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभेचे खासदार झाले असल्याने ते पुन्हा लोकसभा लढवतील असे मला वाटत नाही.’