मुलीला डॉक्टर बनवत ‘ति’ने मिटवला वेश्या असल्याचा डाग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 07:00 AM2019-05-12T07:00:00+5:302019-05-12T09:57:43+5:30
कोवळ्या वयात नरकयातना भोगत घरी पैसे पाठवून आईवडिलांचा संसार सावरत असताना तिला एक सोबती मिळाला.
- लक्ष्मण मोरे -
पुणे : घरच्या आर्थिक हलाखीमुळे देवदासी म्हणून सोडल्यानंतर वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली. कोवळ्या वयात नरकयातना भोगत घरी पैसे पाठवून आईवडिलांचा संसार सावरत असताना तिला एक सोबती मिळाला. त्याच वस्तीत मजुरी करणाऱ्या तरुणासोबत प्रेम विवाह केल्यानंतर तिच्या संसारवेलीवर दोन फुले उमलली. जिद्दीने स्वत:च्या मुलांना शिक्षण दिले. ‘पेशा’च्या पलिकडे जाऊन मुलीला डॉक्टर बनवित ‘ति’ने स्वत:च्याच जगण्याला सन्मान मिळवून दिला आहे.
संगव्वा (बदलेले नाव) कर्नाटकातील जमंडी जवळच्या एका गावामध्ये आईवडिलांसह राहात होती. तिला अगदी अल्लड वयातच अंधश्रध्देमुळे देवदासी म्हणून सोडण्यात आले. साधारणपणे ३० वर्षांपूर्वी ओळखीमधूनच ती बुधवार पेठेतील वेश्या वस्तीमध्ये पैसे कमाविण्यासाठी दाखल झाली. याठिकाणी अन्य मुलींसोबत चेहºयाला रंगरंगोटी करायची आणि रस्त्यावर ग्राहकाची वाट पाहत उभे राहायचे हा दिनक्रम बनला होता.शरीराची भूक भागविण्यासाठी येणाºया ग्राहकांच्या आपुलकीच्या शब्दांमागील कोरडेपणा तिला नकोसा वाटत होता. पण इलाज नव्हता. गावी आईवडिलांनाही पैसे पाठवावे लागत होते.
याच काळात ती ज्या ठिकाणी उभी राहायची तेथे समोरच असलेल्या किराणा मालाच्या दुकानामध्ये एक तरुण मजुरी करायचा. त्याला संगव्वा आवडत होती. संगव्वा तयार झाली पण तिने वेश्या व्यवसाय सोडणार नाही अशी अट घातली. त्याने ती मान्य केली. दोघांनी लग्न केले. दोघांनीही हळूहळू पैसे साठवत वेश्यावस्तीतून बाहेर पडायचा निर्णय घेतला. पुण्याच्या दक्षिण भागात सुरुवातीला भाड्याने घर घेतले. दरम्यान, त्यांना दोन मुली आणि एक मुलगा झाला.
आपल्या मुलांना सन्मानाचे जगणे मिळायला हवे यासाठी दोघांनी त्यांना शिकविण्याचा निर्णय घेतला. त्यांना शाळेत घालण्यात आले. याच काळात संगव्वाचे पती काम करीत असलेले दुकान दोघांनी मिळून चालविण्यास घेतले. तिने वेश्याव्यवसाय बंद करुन पूर्णवेळ दुकानामध्ये द्यायला सुरुवात केली. मुली मोठ्या झाल्या होत्या. थोरल्या मुलीचे फारसे शिक्षण झाले नाही. तिचे हैदराबाद येथील तरुणासोबत चांगल्या घरात लग्न लावून देण्यात आले. दुसऱ्या मुलीसह मुलाकडे मात्र दोघांनी शिक्षणाचा आग्रह धरला. धाकट्या मुलीने आपली आई नेमके काय काम करते याची जाणीव ठेवत जिद्दीने शिक्षण पूर्ण केले. मेडीकलचे शिक्षण पूर्ण करुन ती डॉक्टर झाली. ती सध्या दक्षिण पुण्यातल्या मोठ्या रुग्णालयात काम करते. मुलगाही सध्या महाविद्यालयामध्ये उच्च शिक्षण घेत आहे.
संगव्वा सांगत होती, मुलीच्या यशामुळे मला गगन ठेंगणे झाले होते. आयुष्यभर भोगलेल्या यातनांचे मुलीच्या रुपाने फळ मिळाल्याचे आणि माझ्या कपाळी बसलेला वेश्येचा डाग मिटल्याची भावना संगव्वाने व्यक्त केली. विशेष म्हणजे मुलांनाही आईच्या ‘पेशा’बद्दल आणि तिने भोगलेल्या यातनांची पूर्ण जाणिव आहे. मुलंही या मातेच्या कष्टांबाबत कृतज्ञ आहेत.