जागावाटप गेलं खड्ड्यात, आधी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा- उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 05:21 PM2018-12-24T17:21:51+5:302018-12-24T17:32:25+5:30
शिवसेना पक्षप्रमुख आज पंढरपूरच्या दौऱ्यावर आहेत. पंढरपुरात त्यांनी जाहीर सभा घेत भाजपावर निशाणा साधला आहे.
पंढरपूर- शिवसेना पक्षप्रमुख आज पंढरपूरच्या दौऱ्यावर आहेत. पंढरपुरात त्यांनी जाहीर सभा घेत भाजपावर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी शिवसेना-भाजपाच्या 2019च्या लोकसभा आणि विधानसभेच्या संभाव्य जागावाटपावरही भाष्य केलं आहे. युती होणार का या फालतू चर्चेत मी जात नाही, जागावाटप खड्ड्यात जाऊ देत, आधी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
पीकविमा योजनेतही मोठा घोटाळा झाल्याचा आरोप पी. साईनाथ यांनी केला आहे. 32 हजार कोटींच्या कर्जमाफीत माझ्या एकाही शेतकरी बांधवाचे कर्ज माफ होत नाही ? हे दुर्दैवी आहे. पीकविम्याचे पैसे केव्हा देताय? कर्जमाफ झालेला शेतकरी कधी दाखवताय ते सांगा, मी सरकारला इशारा देतोय की, कांदा प्रश्न किती दिवसात सोडवताय ते सांगा?, काँग्रेसचं अपत्य तुम्ही का मांडीवर घेता, कशाला त्याला दूध पाजता ?, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपावर घणाघाती टीका केली आहे.
उद्धव ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे :
खास पंढरपूरसाठी विठाई बससेवेचं उद्घाटन
समोरचा गोरगरीब हाच शिवसेनेचा देव.
धनगर समाजाच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी.
कुंभकर्णाला जागं करायला मी अयोध्येत गेलो होतो.
राम मंदिर बांधणार म्हणजे बांधणारच
जे करून दाखवतो तेच बोलतो, जे बोललो ते करून दाखवतो
सर्व जातीपातीच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढा देणार
राम मंदिर दिखेगा कब ?
बाबरी पाडून घेतली, बाबरीच्या मुद्दावरून गादी बळकावलीत आणि त्यावर कुंभकर्णासारखे लोळताय ?
सोहराबुद्दीन खटल्यातील सगळे निर्दोष मुक्त झाले, मात्र बाबरी पाडणाऱ्यांविरोधातील खटले अजून सुरू आहेत
30 वर्षे होत आली, आता तुम्ही सांगता की न्यायालयात हा मुद्दा आला आहे?
हिंदू भोळा आहे, मात्र तो बावळट नाही
राम मंदिर आणि हिंदुत्वाच्या मुद्दावर संसदेत चर्चा होऊन जाऊ दे, एनडीएतील किती पक्ष विरोधात आहे आणि किती समर्थनात आहे हे कळेल.
राम मंदिराबाबत नितीश कुमार आणि रामविलास पासवान यांचे मत काय आहे ?
जे नितीश संघमुक्त भारत करायला निघाले होत त्यांच्या मांडीला मांडी लावून भाजप बसलंय.
नितीशकुमार आणि रामविलास यांच्यापुढे भाजपने नमतं घेतलं, चांगली गोष्ट आहे.
शेतकरी हा काही मल्ल्या, मोदी नाही.
गोरगरिबांना नाडण्याचा प्रयत्न केलात तर त्याची गाठ शिवसेनेशी आहे हे लक्षात ठेवा.
गावागावातील शिवसेनेच्या शाखा, गोरगरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी आधाराचे केंद्र बनेल
शिवसेना निवडणुका बाजूला ठेवून गोरगरिब, शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरायला तयार आहे
पीकविम्याचे पैसे केव्हा देताय? कर्जमाफी झालेला शेतकरी कधी दाखवताय ते सांगा
मी सरकारला इशारा देतोय, कांदा प्रश्न किती दिवसात सोडवताय?
मला जागावाटपात स्वारस्य नाही, शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे
काँग्रेसचं अपत्य तुम्ही का मांडीवर घेता, कशाला त्याला दूध पाजता ?
देवांच्या नावाने जुमला केलात तर तुम्हाला ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही
राम मंदिराचा मुद्दा सोडणार नाही, सुटू देणारही नाही
महाराष्ट्रावरचं संकट टाळण्यासाठी पांडुरंग पाहिजे, दुष्काळ निवारणासाठी पांडुरंग पाहिजे तर मग मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडा, पांडुरंगच तिथे बसेल.
शिवसेनेचं राज्य आणणार म्हणजे, आणणारच
छत्तीसगडमधल्या लोकांनी घाण पहिले साफ केली, याला म्हणतात धाडस आणि हे धाडस मला शिवरायांच्या महाराष्ट्राकडून अपेक्षित आहे.