पीएम तुमचा, सीएम आमचा; शिवसेनेच्या मागणीनं युतीत नवा लोच्या?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 01:30 PM2019-02-14T13:30:18+5:302019-02-14T13:31:45+5:30
शिवसेनेच्या मागणीमुळे युतीच्या चर्चेत नवा ट्विस्ट
नवी दिल्ली: व्हॅलेंटाईन वीक संपत आला, प्रॉमिस डे, हग डे गेला, व्हॅलेंटाईन डे आला तरी, युतीचं मनोमीलन काही झालेलं नाही. लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असतानाही शिवसेना-भाजपामध्ये जागावाटपावरुन चर्चा सुरुच आहे. शिवसेना आणि भाजपाचे नेते एकमेकांना इशारे देत आहेत. मात्र पडद्याआड युतीची बोलणीदेखील सुरू आहे. मात्र अद्यापही या चर्चांना मूर्तस्वरुप आलेलं नाही. एका बाजूला शिवसेना-भाजपा नेत्यांमध्ये युतीची चर्चा सुरू असताना आता शिवसेनेनं नवी मागणी केली आहे. शिवसेनेच्या नव्या मागणीमुळे नवा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.
भाजपाच्या नेतृत्त्वाखालील एनडीएत असणारे पक्ष त्यांच्या राज्यात भक्कम स्थितीत आहेत. त्यामुळे तुमचा पंतप्रधान होणार असेल, तर मुख्यमंत्रीपद मित्रपक्षांना द्या, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. 'एनडीएनं 2019 मध्ये सत्ता स्थापन केल्यास त्यात शिवसेना, अकाली दल आणि एनडीएतील मित्रपक्षांची महत्त्वाची भूमिका असेल. एनडीएतील मित्रपक्ष त्यांच्या त्यांच्या राज्यात अतिशय भक्कम स्थितीत आहेत. त्यामुळे भाजपाला जर केंद्रात मित्रपक्षांचा पाठिंबा हवा असेल, तर त्यांनी मुख्यमंत्रीपद मित्रपक्षांसाठी सोडावं,' असं राऊत यांनी म्हटलं आहे. राऊत यांच्या या मागणीमुळे युतीच्या बोलणीत नवं वळण येऊ शकतं.
Shiv Sena leader Sanjay Raut: If NDA government is formed in 2019, Shiv Sena, Akali Dal & other major allies will have a role. All the allies of NDA are strong in their states & if you want to have an alliance with them at centre, the CM in that state should be from that ally. pic.twitter.com/3KRoPPvMo9
— ANI (@ANI) February 14, 2019
शिवसेना-भाजपामधील जागा वाटपाचं सूत्र ठरल्याची माहिती कालच समोर आली होती. मात्र अद्याप याबद्दल दोन्ही पक्षांकडून कोणीही अधिकृतपणे माहिती दिलेली नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपा 25, तर शिवसेना 23 जागा लढवणार असून विधानसभा निवडणुकीत भाजपा 145, तर शिवसेना 143 जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपाच मोठा भाऊ असेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. युतीचा तिढा सोडवण्यासाठी भाजपाचे तीन दिग्गज नेते लवकरच मातोश्रीवर जाणार आहेत. भाजपा अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी हे तीन बडे युतीची बोलणी करण्यासाठी मातोश्रीवर जाणार असल्याचं समजतं. मात्र आता शिवसेनेनं थेट मुख्यमंत्रीपद मागितल्यानं युतीचं काय होणार, हे पाहणं महत्त्वपूर्ण ठरेल.