शिवसेनेला किंमत मोजावीच लागेल; नितीन गडकरींचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 09:18 PM2019-12-05T21:18:26+5:302019-12-05T21:19:20+5:30
नितीन गडकरी यांची मुलाखत एका वृत्तवाहिनीने घेतली. यावेळी त्यांना झारखंडमध्ये भाजपाला धोका आहे का असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी गडकरी यांनी त्यांना भाजपाला धोका असल्याचे वाटत नसल्याचे म्हटले.
रांची : झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराला सुरूवात झाली असून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. यावेळी नितीन गडकरींनी शिवसेनेला मोठा इशारा दिला आहे.
नितीन गडकरी यांची मुलाखत एका वृत्तवाहिनीने घेतली. यावेळी त्यांना झारखंडमध्ये भाजपाला धोका आहे का असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी गडकरी यांनी त्यांना भाजपाला धोका असल्याचे वाटत नसल्याचे म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली इतिहासातील सर्वात चांगले सरकार झारखंडला मिळाले आहे. तसेच झारखंड विकासाच्या दिशेने वेगात जात आहे. जनतेला विकास हवा आहे आणि रघुवर दास यांच्या नेतृत्वात भाजपाची निश्चित विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यानंतर त्यांना महाराष्ट्रातील सहकारी शिवसेनाही विधानसभा निवडणुकीनंतर वेगळी झाल्याचे विचारले असता गडकरींनी अप्रत्यक्ष शिवसेनेला इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील शिवसेना आणि काँग्रेस यांच्या आघाडीचे सरकार फार काळ टिकणार नाही. त्याचबरोबर येणाऱ्या काळात शिवसेनेला या आघाडीची किंमत मोजावी लागणार असल्याचा इशारा दिला आहे.
झारखंडची निर्मिती झाल्यावेऴी जेवढे राष्ट्रीय महामार्ग नव्हते त्याच्यापेक्षा जास्त महामार्ग आम्ही दिले आहेत. झारखंडमध्ये रस्त्यांचा मोठा विकास झाला आहे, असा दावाही गडकरी यांनी केला.
भाजपाचे आमदार फुटणार?
भाजपातील डझनभर आमदार फुटणार असे धादांत खोटे आणि वास्तवाशी कुठलाही संबंध नसलेले वृत्त आज सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध करण्यात आले आहे. ही निव्वळ अफवा आहे. तिघाडीच्या नेत्यांकडून अशा अफवा पसरवण्यात येत आहेत. चोराच्या उलट्या बोंबा मारणे सुरु आहे. भाजपामध्ये अन्य पक्षातून आलेले असो वा मुळ भाजपाचे असलेले आमदार सर्व पक्ष शिस्त पाळणारे आहेत. त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा,आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. किंबहुना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून जे काम केले त्यामुळेच आश्वासक, प्रभावी, पारदर्शी नेतृत्वावर विश्वास ठेऊन अन्य पक्षातून अनेक आमदार भाजपमध्ये आल्याचा दावा आशिष शेलार यांनी केला आहे.