भीती वाटत असेल तर निवडणूक लढवू नका; मातोश्रीवर खासदारांची परेड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 11:37 AM2019-01-22T11:37:12+5:302019-01-22T13:24:13+5:30
शिवसेना मुखपत्रातून आणि सभांमधून भाजपवर जोरदार टीका करत आहे. राफेल करार, शेतकरी कर्जमाफीवरही टीका केली जात आहे.
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत वेगळे लढण्याचा निर्धार केल्यानंतर येत्या लोकसभेसाठी भाजपसोबत युती करणार नाही असा पवित्रा घेतल्याने शिवसेनेच्या खासदारांमध्ये खळबळ उडाली आहे. यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या खासदारांची मातोश्रीवर परेड घेत चांगलीच कानउघडणी केली.
शिवसेना मुखपत्रातून आणि सभांमधून भाजपवर जोरदार टीका करत आहे. राफेल करार, शेतकरी कर्जमाफीवरही टीका केली जात आहे. यामुळे आधीच भाजपसोबत तणावाचे वातावरण आहे. अशातच युती न झाल्यास निवडून न येण्याची धास्ती शिवसेनेच्या काही खासदारांनी घेतली आहे. गेल्या वर्षभरापासून युतीसाठी मोर्चेबांधणीही या खासदारांनी सुरु केली होती. मात्र, आज उद्धव ठाकरे यांनी या खासदारांना मातोश्रीवर बैठकीसाठी बोलावले होते.
यावेळी खासदारांची कानउघडणी करताना ज्यांना भीती वाटत असेल त्यांनी निवडणूक लढवू नये, असे स्पष्ट शब्दांत सांगितले. तर यावेळी पाच खासदारांनी युती केली नाही तर निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केल्याचे समजते. तसेच युतीची शक्यता मावळल्याचेही संकेत या बैठकीत देण्यात आले.