शिवाजी विद्यापीठ करणार सहा गावे ‘आदर्श’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2015 01:01 AM2015-07-14T01:01:30+5:302015-07-14T01:01:30+5:30
‘स्वच्छ, स्वस्थ भारत’ अभियानांतर्गत कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील एकूण सहा गावे शिवाजी विद्यापीठ ‘आदर्श ग्राम’ म्हणून विकसित करणार आहे.
कोल्हापूर : ‘स्वच्छ, स्वस्थ भारत’ अभियानांतर्गत कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील एकूण सहा गावे शिवाजी विद्यापीठ ‘आदर्श ग्राम’ म्हणून विकसित करणार आहे. त्यासाठी जिल्हानिहाय उपसमित्यांची सोमवारी स्थापना करण्यात आली. शिवाय जुलैअखेर कृती आराखडा निश्चित करण्यात येणार आहे.
केंद्र सरकार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) सूचनेनुसार विद्यापीठाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी कृती आराखडा निश्चिती, उपसमित्यांच्या स्थापनेबाबत विद्यापीठात सोमवारी बैठक झाली. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. विद्यापीठ दत्तक घेतलेल्या गावांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे सांगाव (ता. कागल), कडगाव (ता. गडहिंग्लज), सांगली जिल्ह्यातील तडवळे (आटपाडी) आणि सातारा जिल्ह्यातील शिरढोण व माहुली आदींचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
विद्यापीठाने निवडलेल्या सहा गावांच्या विकासासाठी पाच वर्षांचा कालावधी असणार आहे. येत्या १५ दिवसांत उपसमिती संबंधित गावांना भेट देऊन पाहणी करतील. त्यानंतर तेथील विकासाच्या दृष्टीने कृती आराखडा निश्चित करण्यात येईल.
- डॉ. डी. के. गायकवाड, संचालक, विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळ.