डांबराचा खर्च अर्धाच दाखवा आणि चांगल्या बातम्यांसाठी पत्रकारांना ‘मॅनेज’ करा - बांधकाममंत्र्यांची अशीही खड्डेमुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 05:25 AM2017-11-10T05:25:02+5:302017-11-10T05:25:21+5:30
राज्यातील रस्ते १५ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त करण्यासाठी अतिरिक्त डांबर लागणार आहे. मात्र डांबराचा अर्धाच खर्च कागदावर दाखवा आणि चांगल्या बातम्यांसाठी पत्रकारांना ‘मॅनेज’ करा, असा अजब सल्ला
सुशील देवकर
जळगाव : राज्यातील रस्ते १५ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त करण्यासाठी अतिरिक्त डांबर लागणार आहे. मात्र डांबराचा अर्धाच खर्च कागदावर दाखवा आणि चांगल्या बातम्यांसाठी पत्रकारांना ‘मॅनेज’ करा, असा अजब सल्ला सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्याने अधिकारी आश्चर्यचकित झाले!
राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १५ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी बांधकाम मंत्री पाटील प्रत्येक जिल्ह्यात बांधकाम विभागाच्या अधिकाºयांच्या बैठका घेत आहेत. गुरुवारी जळगाव जिल्ह्याची बैठक झाली. शाखा अभियंतापासून तर अधीक्षक अभियंता दर्जाच्या अधिकाºयांची या बैठकीला उपस्थिती होती. खड्डेमुक्त अभियान गतीने मार्गी लावण्यासोबतच टीका टाळण्यासाठी चार युक्तीच्या (?) गोष्टीही त्यांनी अधिकाºयांना सांगितल्या. ते म्हणाले, खड्डे (पॉट होल) बुजवण्यासाठी मशिन घेतले आहे. मात्र त्याला नियमित कामापेक्षा दुप्पट डांबर लागते. अतिरिक्त डांबर वापरल्यावरून टीका होऊ शकते. त्यामुळे डांबराचा निम्मा खर्च अदृश्य करा आणि जो खर्च सर्वसाधारण तंत्राला लागतो, तेवढाच पेपरवर घ्या, असा कानमंत्रही त्यांनी दिला.
रस्त्यांच्या बांधकामासंदर्भात शासन निर्णयांमध्ये सतत बदल होत असल्याने येणाºया अडचणी काही अधिकाºयांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यावरही मंत्री पाटील यांनी ‘बौद्धिक’ घेतले.
पाऊस पडला की खड्डे पडणारच
महाराष्टÑातील रस्त्यांचा बेस तयार झालाच नाही. कारण पूर्वी ८०० कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद असायची. हळूहळू ती १२०० कोटींवर व आता ४ हजार कोटींवर आली आहे. पाऊस पडला की खड्डे पडतातच. खड्डे बुजविण्याएवढेच हे बजेट असते. मात्र अचानक खड्डे झाले, असे भासवून सरकारला घेरण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र मी अशा आरोपांना पुरून उरतो, असा दावाही बांधकाममंत्र्यांनी केला.
सुप्रिया सुळेंना सध्या भरपूर रिकामा वेळ
राष्टÑवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकताच त्यांच्या मतदारसंघातील एका खड्ड्याचा सेल्फी काढून सोशल साईटवर टाकला. वृत्तपत्रातूनही तो गाजला. त्याचा उल्लेख करीत चंद्रकांतदादा म्हणाले, सध्या त्यांचे सरकार नसल्याने त्यांना भरपूर वेळ आहे, त्यामुळे त्यांनी खड्ड्याचा सेल्फी काढून व्हायरल केला. आम्हीपण त्यांच्या मतदारसंघातील दुरुस्त केलेले २८ फोटो काढून भरलेले खड्डे दाखविले. अजून एखादा खड्डा राहिला असेल तर कळवा, असे सांगितले. त्यांनी त्यावर धन्यवाद दिले. आम्ही स्वागत आहे, म्हणून त्यांचे तोंड बंद केले.
चांगल्या बातम्या ‘मॅनेज’ करा
राज्यातील विरोधक निष्प्रभ झाले असल्यामुळे पत्रकारच विरोधकांची भूमिका पार पाडत आहेत. वर्तमानपत्रातील टीका टाळण्यासाठी चांगल्या बातम्या ‘मॅनेज’ करण्याचा सल्लाही बांधकाममंत्र्यांनी या बैठकीत अधिकाºयांना दिला.
पूर्वी अर्धा ते १ किमी लांबीचे खड्डे दुरुस्तीचे टेंडर काढले जात होते व खड्डे न भरताच बिलही काढायची सवय होती. आम्ही १० किमीच्या खाली असे टेंडर काढता येणार नाही, असा नियम केला. त्यामुळे कंत्राटदारांची गोची झाली. वेळ पडली तर मी स्वत: फावडा,
टोपली घेऊन रस्त्यांचे खड्डे
बुजवायला रस्त्यावर उतरेन. मात्र नियमात बदल करू देणार नाही.