हिम्मत असेल तर सदाशिव पेठेस 'ठाकरे पेठ' नाव द्या; समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव देण्यास विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 02:54 PM2018-11-14T14:54:40+5:302018-11-14T14:57:24+5:30
बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या नेत्यांनी विदर्भ राज्याचे वचन पाळले नाही, असा आरोप करत शिवसेना नेत्यांची नावे मुंबई, पुण्यात शोभतील, असे श्रीहरी अणे म्हणाले. तसेच, हिम्मत असेल तर सदाशिव पेठेला 'ठाकरे पेठ' नाव द्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
मुंबई : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या नामकरणावरुन सध्या शिवसेना-भाजपामध्ये वाद सुरु आहे. समृद्धी महामार्गालाशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यायचे की माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे, यावरुन शिवसेना-भाजपा आमनेसामने आले आहेत. दरम्यान, या वादात आता माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी उडी घेतली आहे. समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यास श्रीहरी अणे यांनी विरोध केला आहे.
श्रीहरी अणे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून शिवसेनेच्या मागणीला विरोध दर्शविला आहे. समृद्धी महामार्ग हे नाव वाईट आहे काय? असा सवाल त्यांनी विचारला आहे. विदर्भासाठी शिवसेनेच्या एकाही नेत्याने काहीच केले नाही. या एका कारणासाठी तरी शिवसेनेच्या नेत्याचे नाव समृद्धी महामार्गाला नको, असे श्रीहरी अणे यांनी म्हटले आहे.
बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या नेत्यांनी विदर्भ राज्याचे वचन पाळले नाही, असा आरोप करत शिवसेना नेत्यांची नावे मुंबई, पुण्यात शोभतील, असे श्रीहरी अणे म्हणाले. तसेच, हिम्मत असेल तर सदाशिव पेठेला 'ठाकरे पेठ' नाव द्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे. याचबरोबर, विदर्भातील महामार्गाचे नाव समृद्धी महामार्ग योग्य आहे. नाव बदलायचेच असेल तर 'विदर्भ' महामार्ग करा. व्यक्ती विशेष नावे हवी असतील तर विदर्भ कर्मभूमी असलेल्या महात्मा गांधी यांचे नाव समृद्धी महामार्गाला द्या, अशी मागणी श्रीहरी अणे यांनी केली आहे.
दरम्यान, शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या शिष्टमंडळाने काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे, अशी मागणी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.