स्वामी समर्थांचा अवतार मानणा-या श्रीकृष्ण पाटीलला अटक, महिलेला शिवीगाळ केल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 11:16 AM2017-09-21T11:16:20+5:302017-09-21T15:35:34+5:30
बाबा गुरमीत राम रहीमची काळी कृत्ये दररोज बाहेर येत असताना आता लवकरच रत्नागिरीतील एका बाबावर अशीच कारवाईची कु-हाड कोळणार आहे.
रत्नागिरी, दि. 21 - बाबा गुरमीत राम रहीमची काळी कृत्ये दररोज बाहेर येत असताना आता रत्नागिरीतील एका बाबावर अशीच कारवाईची कु-हाड कोसळली आहे. श्रीकृष्ण पाटील असे या बाबाचे नाव असून, महिलेला अश्लील शिवीगाळ केल्या प्रकरणी पाटील बाबावर कारवाई होणार आहे. श्रीकृष्ण पाटील स्वत:ला स्वामी समर्थांचा अवतार समजतो.
श्रीकृष्ण पाटीलची एक व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. भक्तांना मार्गदर्शन करतानाही हा बाबा शिवराळ भाषा वापरायचा. रत्नागिरी पोलिसांनी या बाबाला अटक केली आहे. बुधवारी रात्री उशिरा त्याला रत्नागिरी शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आणि गुरुवारी सकाळी त्याला रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी अटक केली. स्वत:ला स्वामी समर्थांचा अवतार मानणारा हा बाबा पोलीस खात्यात नोकरीला होता. रत्नागिरीतल्या झरेवाडीमध्ये या बाबाचा मठ आहे. पोलीस दलातून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने मठ स्थापन केला.
पाटीलबाबा तथा पाटीलबुवा याचा एक व्हिडीओ गेले काही दिवस सोशल मीडियावर गाजत होता. या व्हिडिओमध्ये हा बाबा नटून थटून लोकांना सामोरा जात असल्याचे दिसत आहे. त्यात तो महिलांबाबत अर्वाच्च शब्दही वापरत आहे. स्वतःला स्वामी समर्थांचा अवतार समजणारा हा बाबा अनेक प्रकारचे दावे करत असल्याचेही या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
त्याआधारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह सहा संस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर केले. त्याचवेळी दोन महिलांनी पाटीलबाबा व त्याचा सहकारी रावराणे अशा दोघांवर विनयभंग आणि शिवीगाळीची फिर्याद दिली. त्याआधारे या बाबाला बुधवारी मध्यरात्रीनंतर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याच्या आरोपावरुन त्याला अटक करण्यात आली आहे.