मालवणात आजपासून सिंधुदुर्ग पर्यटन महोत्सव

By Admin | Published: January 28, 2015 11:39 PM2015-01-28T23:39:49+5:302015-01-29T00:18:32+5:30

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन : जिल्हा विकासाबाबत घोषणेकडे लक्ष

Sindhudurg Tourism Festival in Malvan From today | मालवणात आजपासून सिंधुदुर्ग पर्यटन महोत्सव

मालवणात आजपासून सिंधुदुर्ग पर्यटन महोत्सव

googlenewsNext

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाच्यादृष्टीने मैलाचा दगड ठरणाऱ्या ‘सिंधुदुर्ग महोत्सवा’चे उद्घाटन उद्या, गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रथमच जिल्ह्यात येणारे मुख्यमंत्री फडणवीस हे जिल्हा विकासाच्यादृष्टीने कोणती घोषणा करतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
सिंधुदुर्ग पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन बोर्डिंग मैदानावर उद्या, गुरुवारी दुपारी २ वा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, खासदार विनायक राऊत, खासदार भालचंद्र मुणगेकर, आमदार विजय सावंत, रामनाथ मोते, अनिल तटकरे, निरंजन डावखरे, वैभव नाईक, नीतेश राणे, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय, पर्यटन प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, ‘एमटीडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन, विभागीय आयुक्त राधेश्याम मोपलवार, युएनडीपी प्रकल्पाचे प्रमुख एन. वासुदेवन, आदी उपस्थित राहणार आहेत.
महोत्सवाची सांगता शनिवारी (दि. ३१) सायंकाळी ६ वाजता पर्यटन गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. गुरुवारी (दि. २९) चिवला बिच येथे सुदर्शन पटनाईक यांच्या वाळू शिल्पांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. सायंकाळी ५ वा. स्थानिक लोककलाकारांचा कार्यक्रम, तर ७ वा. ‘जल्लोष’ हा मराठी सिनेकलाकारांचा मनोरंजनपर कार्यक्रम होणार आहे. शुक्रवारी ( दि. ३०) सकाळी १० ते १२ या वेळेत सिंधुदुर्ग पर्यटन संधी परिसंवाद, दुपारी ३ ते ५ मालवणी खाद्यपदार्थांचे सादरीकरण, सायंकाळी ५ ते ७ सांस्कृतिक कार्यक्रम, ७ ते १० सिनेअभिनेते विजय कदम यांचा ‘खुमखुमी’ हा कार्यक्रम होणार आहे. शनिवारी (दि. ३१) कृषी कार्यशाळा, कलाविष्कार, महोत्सवाचा समारोप सोहळा होणार आहे. मालवण येथे आयोजित सिंधु पर्यटन महोत्सवाला भव्य शोभायात्रेने प्रारंभ होणार असून, मालवण शहरातून गुरुवारी ( दि. २९) सकाळी १० वा. ही शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत जिल्ह्यातील पर्यटनाबरोबरच विविध संस्कृतींचे दर्शन घडविणारे आकर्षक चित्ररथ सहभागी होणार आहेत. पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने बोर्डिंग मैदानावर ‘गेट वे आॅफ इंडिया’ची प्रतिकृती असलेले प्रवेशद्वार उभारले आहे.
आज, बुधवारी सुरक्षा यंत्रणेच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलिसांचे बोर्डिंग मैदानावर संचलनही झाले. (प्रतिनिधी)

Web Title: Sindhudurg Tourism Festival in Malvan From today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.