...म्हणून मुख्यमंत्र्यांचे संतुलन ढासळत चालले आहे - अशोक चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 05:28 PM2019-02-04T17:28:49+5:302019-02-04T17:33:13+5:30
आगामी निवडणुकीत पराभव समोर दिसत असल्याने मुख्यमंत्र्यांचे मानसिक संतुलन ढासळत चालले असून विरोधकांना कुत्रे संबोधून त्यांनी राजकीय संवादाचा स्तर अत्यंत हीन पातळीवर आणला आहे.
मुंबई : आगामी निवडणुकीत पराभव समोर दिसत असल्याने मुख्यमंत्र्यांचे मानसिक संतुलन ढासळत चालले असून विरोधकांना कुत्रे संबोधून त्यांनी राजकीय संवादाचा स्तर अत्यंत हीन पातळीवर आणला आहे. मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र सुसंस्कृतांचा आहे, हे लक्षात ठेवा! असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध करून खा. चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्राला समृद्ध राजकीय सांस्कृतीक आणि वैचारिक परंपरा आहे. अनेक राजकीय नेत्यांनी महाराष्ट्राला वैचारिक वारसा दिला आहे. अनेक थोर नेत्यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले परंतु राजकीय संवादाचा स्तर कधीही ढासळू दिला नाही.
विरोधक हे लोकशाहीमधील महत्त्वाचा घटक आहेत आणि त्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे याची जाणिव आतापर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी ठेवली. परंतु राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाषा ही सुसंस्कृत व पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नाही हे या अगोदरही अनेकवेळा दिसून आले होते. या अगोदरही त्यांनी शेतक-यांच्या सुकाणू समितीला जिवाणू समिती आणि आंदोलक शेतक-यांना देशद्रोही म्हटले होते. संघर्ष यात्रा काढली म्हणून विरोधकांना कोडगे व निर्लज्ज, तसेच मीरा भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीत विरोधकांना दलाल म्हटले होते.
आता याच्याही खालची पातळीवर जाऊन त्यांनी विरोधकांना कुत्रे म्हणून संबोधले आहे. पराभवाच्या भीतीतून मुख्यमंत्र्यांचे खरे चरित्र समोर येत चालले आहे. महाराष्ट्राच्या जनतेने अशा विचारांना कधीच स्थान दिले नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत जनता भारतीय जनता पक्षाला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला.