सोलापूरमध्ये कंपनीने कमावला ठेवीतून नफा! ३१२ कोटींचा निधी मिळाला; एक हजार कोटींचा आराखडा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 12:57 AM2018-09-03T00:57:35+5:302018-09-03T00:57:46+5:30
स्मार्ट सिटीसाठी ३१२ कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत़ १ हजार कोटींचा आराखडा असून योजनेत ४२ कामे होणार आहेत़ ४ कामे सुरू झाली आहेत़ त्यातील काही कामांना गती मिळालेली नाही.
- राजकुमार सारोळे
सोलापूर : स्मार्ट सिटीसाठी ३१२ कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत़ १ हजार कोटींचा आराखडा असून योजनेत ४२ कामे होणार आहेत़ ४ कामे सुरू झाली आहेत़ त्यातील काही कामांना गती मिळालेली नाही. या योजनेसाठी स्थापन केलेल्या कंपनीच्या विविध बँकांत ३२३ कोटींच्या अल्प मुदतीच्या ठेवी असून, त्यातून यावर्षी १ कोटी ६३ लाखांचा नफा झाला आहे.
विविध ठेवींतून कंपनीला आतापर्यंत ४ कोटी ४७ लाख ९८ हजार इतके व्याज मिळाले आहे. थोडक्यात विकासासाठी देण्यात आलेले हे पैसे पडून आहेत. महापालिकेने २,२४७ कोटींचा प्रकल्प अहवाल सादर केला होता़ त्यामध्ये ४४ प्रकल्प आहेत़
जलवाहिनीसाठी २०० कोटी
एनटीपीसीने पाणी पुरवठ्यासाठी २५० कोटी राखीव ठेवले आहेत. यात स्मार्ट सिटी योजनेतील २०० कोटी जमा करून ४५० कोटींत समांतर जलवाहिनी योजना राबविण्याचा प्रस्ताव आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने उजनी ते सोलापूर अशी ११० दशलक्ष लिटर क्षमतेची जलवाहिनी टाकण्यासाठी ४३९ कोटींचा प्रकल्प अहवाल तयार केला आहे. योजनेस शासनाने मंजुरी दिली आहे. १० ठिकाणी ई टॉयलेट बसविण्यात आले.