लवकरच पंढरपूर देवस्थान समिती नेमू- रणजित पाटील
By Admin | Published: August 3, 2016 03:29 AM2016-08-03T03:29:46+5:302016-08-03T03:29:46+5:30
श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठलभक्तांना आवश्यक सेवा सुविधा पुरविण्यासाठी लवकरच देवस्थान समिती स्थापन केली जाईल
मुंबई- संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठलभक्तांना आवश्यक सेवा सुविधा पुरविण्यासाठी लवकरच देवस्थान समिती स्थापन केली जाईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली.
पंढरपूर येथील विकासकामांच्या दुरवस्थेबाबत शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे, ख्वाजा बेग, किरण पावसकर, राहुल नार्वेकर आदी राष्ट्रवादीच्या सदस्यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या वेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री पाटील म्हणाले की, वारीच्या निमित्ताने पंढरपुरात दाखल होणाऱ्या वारकऱ्यांसाठी एकरात निवासाची सोय केली जाते.
नुकत्याच झालेल्या आषाढी वारीला २० हजार शौचालये बांधण्यात आली. तसेच ११ हजार फायबर शौचालये पुरवण्यात आली होती. चांगली स्वच्छता होण्यासाठी अडीचपट करही वाढवण्यात आला आहे. पंढरपूरसाठी ८३७ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून, ४० कोटींची कामे पूर्ण करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.