राज्यात पावसाची साखर पेरणी! मराठवाडा सुखावला, मुंबईसह ठाणे, रायगड, पालघरमध्ये संततधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 05:44 AM2017-08-21T05:44:18+5:302017-08-21T05:44:49+5:30
तब्बल तीन आठवड्यांपासून राज्यावर रुसलेला पाऊस हवामान खात्याच्या अंदाजानुसार, रविवारी कुठे झिम्माड, कुठे धुवांधार, कुठे घनघोर, तर कुठे मुसळधार होऊन बरसला. दुष्काळाची धग जाणवणाºया मराठवाड्यासह राज्यात पावसाने साखर पेरणी केली आहे. नदी-नाल्यांना पूर आला आहे. जलधारांनी शेतशिवार भिजल्याने तग धरलेल्या पिकांना त्याचा फायदा होईल, तर रब्बीच्या पेरण्यांना प्रारंभ करता येणार आहे. मराठवाड्यात ४२१ पैकी तब्बल १७० मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. पावसामुळे बळीराजाच्या बैल पोळा सणाचा गोडवा वाढला आहे.
मुंबई : मुसळधार पावसाने मुंबई शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरांसह ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्याला झोडपून काढले. रविवारी पहाटेपासूनच सुरू झालेल्या पावसाने रात्री उशिरापर्यंत जलधारांचा मारा कायम ठेवला. रविवारी सुट्टीच्या दिवशी पडलेल्या या पावसाने मुंबईकरांना सुखद गारवा दिला. दुपारचा काही वेळ वगळता, सकाळसह सायंकाळी सर्वत्रच कोसळलेल्या जलधारांनी मुंबई न्हाऊन निघाली. येत्या ४८ तासांत मुंबईत सर्वत्र मुसळधार पाऊस पडेल, असा इशाराही मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे.
सुट्टी, त्यात मेगाब्लॉक व पावसाच्या संततधारेने रविवारी ठाणे जिल्हा थंडावल्याचे चित्र होते. दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे भातसा धरणाच्या पातळीत वाढ झाली असून, रविवारी या धरणाचे पाच दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले. त्यामुळे भातसा नदी किनाºयावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. माळशेज घाटातही संततधार पाऊस आणि दाट धुके असल्यामुळे वाहतूक मंदावली. भातसा नदीच्या पुरामुळे सापगावकडे जाणाऱ्या पुलावरील वाहतूक बंद करावी लागली. कल्याणजवळील वाळकस पुलावर तीन फुटांवरून पाणी वाहत असल्यामुळे हा पूलही रहदारीसाठी बंद झाला.
रायगडमध्ये जोर कायम
रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सर्वाधिक पावसाची नोंद पेण येथे १२० मि.मी. झाली आहे. पेण तालुक्यातून गणेशमूर्ती परगावी रवाना होण्याच्या काळातच पावसाने जोर धरल्याने गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्यांची तारांबळ उडाली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कामातही या पावसामुळे समस्या निर्माण होत आहेत.
पालघरला झोडपले
पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले. जव्हार, विक्रमगड, मोखाडा, पालघर, डहाणू, वाडा येथे पावसाचा जोर जास्त होता. यामुळे गणेशोत्सवापूर्वी आलेल्या शेवटच्या रविवारच्या खरेदीच्या उत्साहावर विरजण पडले.
गोदावरीला पूर : नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. संध्याकाळी सहा हजार ४०० क्यूसेक इतके पाणी नदीपात्रात सोडले जात होते. त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला.
पावसाचे ९ बळी
पावसाचे मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, बीड आणि नांदेड जिल्ह्यांत वेगवेगळ््या दुर्घटनांत आठ बळी गेले. नगरला भिंत पडून एकाचा मृत्यू झाला.
जोर कायम राहणार : पुढील तीन-चार दिवस राज्यात अनेक भागांत पावसाचा जोर कायम राहणार आहे. सोमवारी उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार, तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला.
महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशसह मध्य भारतात येत्या दोन आठवड्यांत चांगला पाऊस अपेक्षित आहे. पावसाचा तुटवटा भरून निघेल, अशी आशा असली, तरी काही ठिकाणी पुराचाही धोका आहे.
-माधवन राजीवन, सचिव, केंद्रीय भूविज्ञान खाते
देशात 26% तुटवडा
निम्मा हंगाम संपल्यावर देशाच्या एक चतुर्थांशाहूनही अधिक भागात अंदाजापेक्षा कमी पाऊस झाला. येत्या काही दिवसांत ही तूट भरून निघेल, अशी आशा आहे.
यंदा चांगला पाऊन होईल, असा अंदाज वर्तविलेल्या हवामान खात्यानुसार सरासरी तूट ५ टक्के असली, तरी देशाच्या एकूण भूभागापैकी २६ टक्के क्षेत्रांत ही तूट त्याहूनही जास्त आहे.
मध्य प्रदेश, केरळ, महाराष्ट्र आणि प. उत्तर प्रदेशात अंदाजाहून बराच कमी पाऊस झाला. हवामान खात्याचे महासंचालक के. जे. रमेश म्हणाले की, गेल्या दोन दिवसांत कर्नाटकात सर्वदूर चांगला पाऊस झाला आहे. मध्य प्रदेश, मराठवाड्यातही पाऊस सुरू झाला आहे. पावसाची स्थिती आणखी सुधारेल, अशी आशा आहे.