एसटी चालक-वाहक भरती :७ हजार ९०० जागांसाठी २० हजार ७७ दावेदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 03:20 AM2017-09-05T03:20:56+5:302017-09-05T03:21:14+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील चालक आणि वाहक पदासाठी नुकतीच लेखी परीक्षा घेण्यात आली. चालक, वाहक पदाच्या ७ हजार ९०० जागांसाठी २० हजार ७७ दावेदार असल्याची माहिती ‘लोकमत’च्या हाती लागली आहे.
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील चालक आणि वाहक पदासाठी नुकतीच लेखी परीक्षा घेण्यात आली. चालक, वाहक पदाच्या ७ हजार ९०० जागांसाठी २० हजार ७७ दावेदार असल्याची माहिती ‘लोकमत’च्या हाती लागली आहे. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची वाहन चालन चाचणी पुण्याच्या भोसरी येथील मध्यवर्ती प्रशिक्षण संस्थेत पार पडणार आहे.
एसटी चालक-वाहक भरतीसाठी ७ हजार ९०० जागांसाठी राज्यभरातून २८ हजार ३१४ अर्ज आले होते. यापैकी २० हजार ३६२ उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली. परीक्षेत २० हजार ७७ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. परिणामी एसटीच्या ७ हजार ९०० जागांसाठी २० हजारांहून अधिक दावेदार आहेत.
कोकणातल्या सिंधुदुर्ग विभागातील पात्र उमेदवारांपासून वाहन चाचणीला ७ स्पटेंबरला सुरुवात होईल. ११ सप्टेंबर रोजी कोकण विभागातील सर्व पात्र महिला उमेदवारांची कागदपत्र तपासणी आणि वाहन चाचणी पुणे येथे घेण्यात येणार आहे. अन्य विभागातील पात्र उमेदवारांना एसएमएस आणि ई-मेलद्वारे वाहन चालन चाचणी परीक्षेची तारीख कळविण्यात येणार आहे. उमेदवार गैरहजर राहिल्यास त्यांना अपात्र म्हणून घोषित करण्यात येईल. याबाबत कोणतेही प्रमाणपत्र विचारात घेतले जाणार नसल्याचे महामंडळातर्फे सांगण्यात आले.