एसटी संपाबाबत राज्य सरकार झोपेतच, हायकोर्टाचे राज्य सरकारवर ताशेरे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2017 04:27 PM2017-10-20T16:27:42+5:302017-10-20T16:45:55+5:30
एसटी संपाबाबत मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
मुंबई- एसटी संपाबाबत मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. एसटी संपाबाबत राज्य सरकार झोपेतच असल्याचं कोर्टाने सुनावलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबद्दलच्या उच्चस्तरीय समितीचं काय झालं? असा सवाल कोर्टाने विचारला. एसटी संपाचा आज चौथा दिवस आहे. या संपावर ठोस पावलं उचलली का ? अशी विचारणाही कोर्टाने केली आहे. एसटीचा संप सुरू असताना सरकारने लोकांसाठी काय पर्यायी व्यवस्था सुरू केली का ? असा सवालही कोर्टाने उपस्थित केला आहे. सरकार काहीच करत नाही त्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्रास होतोय,अशा शब्दात हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारलं आहे.
'संपाबाबत काही ठोस करत आहात का ते सांगा. इतर काही ऐकण्यात कोर्टाला रस नाही', अशा कडक शब्दात कोर्टाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले. 'संपानंतर काही ठोस फॉर्म्युला केला आहे का?, काही पॉलिसी केली आहे का?, कोर्ट तडजोड करण्यासाठी बसलं नाही. लोकांसाठी काही पर्यायी व्यवस्था केली आहे का? उच्चाधिकार समितीचं काय झालं?, असे प्रश्न विचारत कोर्टाने सरकारला सुनावलं.
'राज्य सरकार काहीच करत नसल्याने जनतेला त्रास सहन करावा लागतो. संप सुरु होण्याआधी आणि सुरु झाल्यानंतर राज्य सरकारने काय उपाय योजना केल्या, ते कोर्टाकडे सादर करा. तोडगा निघण्यासाठी राज्य सरकारने एक तरी सकारात्मक पाऊल टाकावं, असं आवाहन हायकोर्टाने केलं आहे.
ST कर्मचा-यांच्या संपाचा चौथा दिवस
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा चौथा दिवस आहे. गेल्या चार दिवसांपासून राज्यभरातील एसटी सेवा पूर्णतः ठप्प आहे. यामुळे ऐन दिवाळीच्या सणात सर्वसामान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सर्वसामन्यांना होणार त्रास पाहता अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी गुरुवारी (19 ऑक्टोबर ) रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचारी आज संप मागे घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसंच संप मागे घेतल्यानंतर एसटी संघटनांचे कर्मचारी तसंच नेते मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ आणि उद्धव ठाकरेंच्या ‘मातोश्री’वर जाऊन भेट घेणार आहे.