राज्य पुन्हा तापले : चंद्रपूर ४७.८ अंशावर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 01:45 PM2019-05-29T13:45:51+5:302019-05-29T13:48:46+5:30
देशाला मॉन्सूनची वाट पहात असला तरी, राज्यातील उष्मा अद्यापही कायम आहे.
पुणे : देशाला मॉन्सूनची वाट पहात असला तरी, राज्यातील उष्मा अद्यापही कायम आहे. उलट कमाल तापमानात सरासरीपेक्षा ३ ते ५ अंशाची वाढ नोंदविण्यात आली असून, पुढील ३ दिवस अशीच स्थिती राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील कमाल तापमानाचा पारा चाळीशीपार गेला असून, चंद्रपूर येथे सर्वाधिक ४७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
गेल्यावर्षी राज्यासह देशातील अनेकभागात सरासरीपेक्षा पावसाची टक्केवारी कमी राहिली आहे. तीव्र उष्णतेमुळे धरणांनी देखील तळ गाठला आहे. अंदमानामधे २० मेच्या सुमारास मॉन्सूनने हजेरी लावली. मात्र, अनुकूल वातावरण नसल्याने मॉन्सूनची पुढील वाटचाल रेंगाळली आहे. साधारण १५ मे नंतर कमाल तापमानात घट होत असते. मात्र, तापमानात घट होण्याऐवजी सूर्य पुन्हा आग ओकू लागल्याचे चित्र राज्यात दिसून येत आहे.
मध्यमहाराष्ट्रात कमाल तापमानात नाशिकचा अपवाद वगळता सरासरी ३ ते ६ अंशांनी वाढ झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भात कमाल तापमानात सरासरी ४ ते ५ अंशाची वाढ झाली असून, पारा ४३ ते ४६ अंश सेल्सिअस दरम्यान आहे. विदर्भात बुलडाणा वगळता इतर जिल्ह्यांत कमाल तापमान ४५ अंशाच्या पुढे गेले आहे. याच बरोबर राज्यातील किमान तापमानाच्या पाऱ्यामध्ये देखील चार अंशापर्यंत वाढ झाल्याने, रात्रीच्या उकाड्यात देखील वाढ झाली आहे. पुढील तीन दिवस अशीच स्थिती राहील.
राज्यातील कमाल तापमान : मध्य महाराष्ट्र - पुणे ३९.७, लोहगाव ४०.९, जळगाव ४३.६, कोल्हापूर ३८, महाबळेवर ३४.२, मालेगाव ४२.४, नाशिक ३८.५, सांगली ३९.४, सातारा ४१.२, सोलापूर ४३.८, मराठवाडा - उस्मानाबाद ४३.४, औरंगाबाद ४२, परभणी ४६.१, नांदेड ४४.५, बीड ४४.२, विदर्भ- अकोला ४५.६, अमरावती ४५.८, बुलडाणा ४१.७, ब्रम्हपुरी ४६.९, चंद्रपूर ४७.८, गोंदिया ४५.५, नागपूर ४७.५, वर्धा ४६.५, यवतमाळ ४५, कोकण- सांताक्रूझ ३४.३, रत्नागिरी ३३.६, डहाणू ३४.६.
..................
राज्यावर जास्त दाबाचा पट्टा असल्याने जमिनी लगतची गरम हवा वर जात नाही. त्यामुळे विदर्भासह राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ नोंदविण्यात येत आहे. पुढील तीन दिवस अशीच स्थिती राहील.
- अरविंद श्रीवास्तव, प्रमुख, जलवायू संशोधन-हवामान विभाग